Join us

गुंतवणूक केली का? सुकन्या समृद्धी योजनेत वाढतेय खातेधारकांची संख्या, आहेत अनेक फायदे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 12:26 PM

आजपासून पुढील २१ वर्षांचा करा विचार, आर्थिक नियोजनाचा आधार.

Sukanya Samriddhi Yojana : मुलींचे उच्च शिक्षण असो किंवा त्यांचे लग्न असो आर्थिक नियोजन वेळेत करणे गरजेचे आहे. आजपासून पुढच्या २१ वर्षांचा विचार केला तर महागाईनुसार, लग्न किंवा उच्च शिक्षणावरील खर्च कितीतरी पटीने वाढेल. अशा परिस्थितीत  सुकन्या समृद्धी योजनेसोबत इतर काही आर्थिक नियोजनाचा आधार घेतला तर निश्चित फायदा होईल, त्यामुळे या योजनेत गुंतवणूक करायला प्राधान्य दिले पाहिजे. 

१५ वर्षांसाठी गुंतवणूक, २१ वर्षांत मॅच्युअर :

योजनेत १५ वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते आणि ती २१ वर्षांत मॅच्युअर होते. जर तुम्ही तुमच्या मुलीचा जन्म होताच तिच्या नावावर हे खाते उघडले, तर वयाच्या २१व्या वर्षी तुम्ही तिच्यासाठी ७० लाखांचा मोठा फंड तयार करू शकता. सुकन्या समृद्धी खात्यात दरवर्षी मुलीच्या नावावर १.५ लाख जमा केले, तर तुम्हाला दरमहा १२,५०० रुपये गुंतवणूक करावे लागतील. १५ वर्षांत एकूण २२ लाख ५० हजारांची गुंतवणूक कराल. सध्या या योजनेवर ८.२ टक्के व्याज आहे.८.२ % सुकन्या समृद्धी योजनेत सध्या व्याज आहे.

वर्षभरात एक लाखांहून अधिक खाती :

टपाल विभागात मुंबईत आता पर्यंत मागील वर्षभरात १ लाख १३ हजार खातेधारकांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती टपाल विभागाने दिली आहे. 

अशी करा गुंतवणूक :

या योजनेत तुम्ही वार्षिक २५० रुपये ते १.५ लाख जमा करू शकता. जर तुमच्या मुलीचे वय दहा वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर सुकन्या खाते उघडू शकता. जितक्या लवकर तुम्ही यामध्ये गुंतवणूक कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी मोठा निधी तयार करू शकता. 

कर सवलतही मिळणार :

सुकन्या समृद्धी योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे गुंतवणूकदार आयकर कायदा १९६१च्या कलम ८०C अंतर्गत कर वाचवू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेचे खाते कोणत्याही पोस्टऑफिस किंवा अधिकृत बँकेत उघडता येते.

आवश्यक कागदपत्रे :

खाते उघडण्यासाठी अर्जाबरोबर मुलीच्या जन्माचा दाखला, मुलगी, आई-वडील यांचं ओळखपत्र पॅनकार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट यापैकी एक द्यावे लागते. त्याचबरोबर राहण्याचा पत्ता आणि त्याचा पुरावा याकरिता पासपोर्ट, रेशन कार्ड, लाइट बिल, टेलिफोन बिल किंवा पाणी बिल आवश्यक आहे.

टॅग्स :व्यवसायपैसागुंतवणूक