Join us

सरकारच्या ‘भीम’ची भरभराट; डाऊनलोड करण्याचे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक, पेटीएमकडे युजर्सने फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 7:34 AM

आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) केलेल्या कारवाईमुळे पेटीएमच्या लोकप्रियतेत घट झाली आहे.

नवी दिल्ली : आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) केलेल्या कारवाईमुळे पेटीएमच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. व्यापाऱ्यांनी ही ॲप डाऊनलोड करण्याचे प्रमाण घटले आहे. लोकांनी इतर पर्यायांचा शोध सुरू केल्याचा सर्वाधिक फायदा केंद्र सरकारच्या भीम ॲपला झाला आहे. फोनपेच्या यूजर्सची संख्याही वाढली आहे.

ॲप इंटेलिजन्स फर्म ‘ॲपफिगर्स’ने जारी केलेल्या अहवालातून ही बाब उघड झाली. गुगल ॲपस्टोअरकडून घेतलेल्या माहितीवरून दिसून आले की, १ ते १० फेब्रुवारी या कालावधीत पेटीएम डाऊनलोड करण्याचे प्रमाण घसरून ८.६७ लाखांवर आले.

दरम्यान, ‘पेटीएम’च्या शेअर्समध्ये मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी तेजीमुळे अप्पर सर्किट लागले. आरबीआयने पेमेंट बॅंकेचे व्यवहार बंद करण्यास मुदतवाढ दिली. तसेच कंपनीचे नाेडल खाते दुसऱ्या बॅंकेत हलविल्याचाही परिणाम दिसून आला.  

‘गुगल पे’ही जोरात

११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान २.७२ लाख जणांनी गुगल पे डाऊनलोड केले. फोन पे ७.७२ लाख जणांनी तर भीम ॲप ११.७० लाख युजर्सनी डाऊनलोड केले आहे.

‘भारतपे’चा दबदबा

व्यापारी व दुकानदारांनी भारतपेला सर्वाधिक पसंती दिली. फेब्रुवारीत पहिल्या आठवड्यात टिअर-१, टिअर-२ आणि टिअर-३ शहरांमध्ये भारतपे डाऊनलोड करण्याचे प्रमाण १०० टक्क्यांनी वाढले.

निर्बंधांचा फटका किराणा क्लबच्या

एका सर्वेक्षणानुसार एकूण दुकानदारांपैकी ६९% जण रोजच्या व्यवहारांसाठी पेटीएम क्यूआर कोडचा वापर करतात.

आरबीआयच्या कारवाईनंतर मात्र यात घट होऊ लागली. निर्बंध लावल्यानंतर पहिल्याच आठवड्यात ४२ टक्के वापरकर्त्यांनी पेटीएमला रामराम ठोकला. बहुतांश व्यापाऱ्यांनी फोन पे व गुगल पेचा वापर सुरू केला.

‘एमस्वाईप’ला ‘पेमेंट ॲग्रीगेटर’ परवाना

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय)  ‘एमस्वाईप टेक्नाॅलाॅजीसझ’ या डिजिटल पेमेंट प्लॅटफाॅर्मला ‘पेमेंट ॲग्रीगेटर’ म्हणून परवाना दिला आहे. कंपनीला २०२२मध्ये तांत्रिक परवानगी मिळाली हाेती. त्याच्यानंतर दाेन वर्षांनी हा परवाना मिळाला आहे. कंपनीकडे सध्या देशभरातील ६ लाखहून अधिक व्यापाऱ्यांचे नेटवर्क आहे.

हा परवाना मिळाल्यामुळे सर्व श्रेणीतील बॅंकिंग सहयाेगी, व्यापारी तसेच एंटरप्रायझेसला पेमेंट तंत्रज्ञान पुरविता येणार आहे. ई-काॅमर्स कंपन्या किंवा ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना या परवान्याद्वारे पेमेंट सुविधा देता येते.

पेमेंट ॲग्रीगेटर ग्राहकांकडून पैसे जमा करतात व ठराविक कालावधीत ते पैसे संबंधित व्यापाऱ्यांकडे वळते करतात.

टॅग्स :व्यवसायबँक