जगविख्यात उद्योगपती रतन टाटा गुरुवारी पंचत्वात विलिन झाले. रतन टाटांचे अनेक किस्से, अनेक आठवणी सांगितल्या गेल्या. डाऊन टू अर्थ असलेल्या रतन टाटांची अनेक दशकांपासून नुस्ली वाडिया यांच्याशी घनिष्ट मैत्री होती. या मैत्रीत सायरस मिस्त्री प्रकरणानंतर फूट पडली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेले. न्यायालयाने एकत्र बसून वाद मिटविण्यास सांगितले. त्यांच्यातील वाद मिटलाही परंतू मैत्री काही कायम राहू शकली नाही.
ही घटना आहे २०१६ मधील. रतन टाटांनी २०१२ मध्ये टाटा समुहातून निवृत्ती घेतली होती. त्यांचा उत्तराधिकारी म्हणून टाटा सन्सच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांची नियुक्ती केली होती. परंतू अल्पावधीतच ही नियुक्ती चुकीची ठरली आणि मिस्त्रींसोबत टाटा ग्रुपचे बिनसले. या वादात कोर्ट कचेऱ्या सुरु झाल्या. रतन टाटांचे अनेक दशकांपासूनचे घनिष्ट मित्र असलेल्या वाडियांनी मिस्त्रींची बाजू घेतली. यातून वाद पुढे वाढत गेला आणि टाटांनी वाडियांना टाटा ग्रुपच्या संचालक मंडळावरून हटविले.
याचा रागग धरून वाडिया यांनी टाटा ग्रुपवर हजारो कोटींचा मानहाणीचा दावा दाखल केला. सर्वोच्च न्यायालयात या वादावर सुनावणी सुरु झाली. तेव्हा कोर्टाने या दोघांनाही तुम्ही बाहेरच एकत्र बसून वाद मिटवा असा सल्ला दिला. या वादावर दोन्ही बाजुंची चर्चा झाली. वाडियांनी खटला मागेही घेतला. पण टाटा-वाडिया यांच्या मैत्रीत पडलेली उभी फूट काही केल्या भरून निघाली नाही.
रतन टाटांनीच वाडियांना संचालक केलेले...
महत्वाचे म्हणजे रतन टाटा यांनी जेआरडी टाटा यांच्या निधनानंतर पाच वर्षांनी नुस्ली वाडिया यांना संचालक मंडळावर आणलेले होते. नुस्ली वाडिया यांनी आपल्याला जेआरडी टाटा यांनी संचालक केल्याचा दावा केला होता.