Lokmat Money > बिझनेस न्यूज > नटसम्राटचे पे्रम आणि ‘आयकर’

नटसम्राटचे पे्रम आणि ‘आयकर’

व्हेलेंटाइन डे (१४ फेब्रुवारीला) जगभर प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. कृष्णा, मानवाच्या जीवनात प्रेमाला अनन्य महत्त्व आहे.

By admin | Published: February 8, 2016 03:32 AM2016-02-08T03:32:06+5:302016-02-08T03:32:06+5:30

व्हेलेंटाइन डे (१४ फेब्रुवारीला) जगभर प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. कृष्णा, मानवाच्या जीवनात प्रेमाला अनन्य महत्त्व आहे.

Nut Samrat's travels and 'income tax' | नटसम्राटचे पे्रम आणि ‘आयकर’

नटसम्राटचे पे्रम आणि ‘आयकर’

सी. ए.उमेश शर्र्मा - अर्जुन (काल्पनिक पात्र) : व्हेलेंटाइन डे (१४ फेब्रुवारीला) जगभर प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो. कृष्णा, मानवाच्या जीवनात प्रेमाला अनन्य महत्त्व आहे. प्रेमापायी अनेक आर्थिक व्यवहार वा पैशाची देवाणघेवाण होत असते; परंतु नियोजन न केल्यास त्यांचा नटसम्राट होऊ नये याची काळजी घ्यावी. या अनुषंगे ‘नटसम्राट’, ‘व्हॅलेंटाइन डे’निमित्त प्रेम व आयकर समजावून सांग?
श्रीकृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, प्रेम हे सर्व कर्माचे मूळ आहे. जसे पती-पत्नी, आई-वडील व मुले, मित्र मंडळी, नवयुवक-युवती यांच्या संबंधाचा पाया प्रेमच आहे. परंतु प्रेमाच्या भावनेसोबत इतर भावना उदा. लोभ, राग, द्वेष इत्यादी मिसळल्यास सर्व गडबड होते व संबंध बिघडतात, जसे नटसम्राटचे झाले. निखळ प्रेम आजकाल क्वचितच पाहायला मिळते. प्रेमापायी एक-दुसऱ्यामध्ये अनेक वस्तूंची देवाणघेवाण होत असते. या भेटवस्तू केव्हा, कशा, कोणत्या, कोणी दिल्या आहेत त्यावरून त्याची करपात्रता ठरते. याला ‘लव्ह अ‍ॅण्ड अफेक्शन’ असे आयकरात म्हणतात. परंतु याची कोणतीही व्याख्या नाही.
अर्जुन : चला, मनुष्याच्या जीवनातील प्रेमाच्या घटनांसोबत आयकराची चर्चा करू या. सर्वांत अगोदर जेव्हा लग्न ठरण्यापूर्वीचा काळ म्हणजे युवक-युवती यांचे प्र्रेमसंबंध जुळत असताना, एक दुसऱ्याला भेटवस्तू किंवा पैशाची देणगी दिल्यास आयकराचे काय होईल?
श्रीकृष्ण : लग्नाअगोदरचा काळ नवयुवक-युवतींसाठी सुवर्णकाळ असतो. परंतु आयकर व इतर कायद्यानुसार लग्न झाल्यानंतरच पती-पत्नीला मान्यता मिळते. गर्लफ्रेण्ड वा बॉयफ्रेण्डदरम्यानचे संबंध आयकर मानत नाही व कर भरावा लागेल. रुपये ५0 हजारपेक्षा जास्तीचे गिफ्ट करपात्र होईल. म्हणूनच लग्नापूर्वी गिफ्ट दिल्यास व त्याचे मूल्य ५0 हजारपेक्षा जास्त असल्यास गिफ्ट घेणाऱ्यास टॅक्स लागू शकतो. म्हणूनच या सुवर्णकाळात सांभाळूनच व्यवहार करावेत. प्रेमाच्या प्लॅनिंगसोबत टॅक्स प्लॅनिंग सांभाळूनच करावी. या सुवर्णकाळात उत्साहापायी अप्रिय घटना घडू नयेत याची काळजी घ्यावी.
अर्जुन : हे कृष्णा, या सुवर्णकाळानंतर येते ‘लग्नाची घटका’ तसेच नवयुवक-युवतीचे लग्नामध्ये पैसे वा गिफ्ट, घर संसार खर्च इत्यादींच्या व्यवहाराचे काय?
श्रीकृष्ण : अर्जुना, नवयुवक-युवतीच्या आयुष्यातील व दोन कुटुंबांच्या मनोमिलणाची वेळ लग्नाद्वारे येते. सर्वत्र आनंदीआनंद असतो व प्रेमाच्या पुढील सुखद प्रवासाची सुरुवात याद्वारे मनुष्याच्या जीवनात होते. लग्न समारंभात मिळालेले सर्व गिफ्टस् व ते कुणाकडूनही मिळाल्यास, कितीही किमतीचे मिळाल्यास करमाफ आहे. नवरा-बायको हे रिलेटिव्हजच्या व्याख्येत आयकराप्रमाणे येतात. परंतु ते कुणाकडून मिळाले याची यादी ठेवावी. तसेच लग्नाचा खर्च, हनीमून टूर इत्यादींचा खर्च नीट हिशोब करून ठेवावा. पती-पत्नीतील मधुर संबंधात पैशाचा वा संपत्तीचा खोडा निर्माण सुरुवातीलाच होऊ देऊ नये. पत्नीला मिळालेल्या दागिन्यांचा पती-पत्नीने नीट सांभाळ करावा. लग्नामध्ये माहेराकडून मिळालेल्या वस्तूंवर ‘स्त्रीधन’ म्हणून पत्नीचे अधिक प्रेम असते. या भावनेचा सांभाळ करावा. पती-पत्नीने आर्थिक नियोजन सुरुवातीपासून केल्यास त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये आर्थिक अडचण येणार नाही व जीवन सुखकर होईल, जसे नटसम्राटच्या पत्नीने बांगड्या सांभाळून ठेवल्या होत्या. शक्यतो गुंतवणूक जॉइंट नावावर करावी. तसेच पतीने पत्नीस गिफ्ट दिल्यास, त्या गिफ्टवरील उत्पन्न क्लबिंग तरतुदीद्वारे ते आयकरात पतीच्या उत्पन्नात गृहीत धरले जाते. पती-पत्नी स्वतंत्र नोकरी अथवा व्यवसाय करीत असल्यास आयकराचे नियम वेगवेगळे लागू होतील व त्यानुसार दोघांनाही स्वतंत्र आयकर रिटर्न भरावे लागेल.
अर्जुन : लग्नानंतरच्या जीवनात मूल-बाळ झाल्यानंतर पती-पत्नीने आर्थिक व्यवहार प्रेमळपणे कसे सांभाळावेत?
श्रीकृष्ण : मूल-बाळ झाल्यानंतर खऱ्या आयुष्याची म्हणजेच कौटुंबिक प्रेम व वात्सल्याची सुरुवात होते. पती-पत्नीने आपापल्या उत्पन्नावर आयकर भरून आर्थिक पुंजी जमा करावी; तसेच मुलांच्या शिक्षणाचा खर्च, गृह कर्ज, विमा पॉलिसी, आरोग्य विमा तसेच आरोग्यावरील खर्च, भविष्य निर्वाह निधी इत्यादी खर्च व सवलत आयकरानुसार घेऊन मुलांनाही त्याचा फायदा होईल असे नियोजन करावे. मुलांना आई-वडिलांचे प्रेम तर हवेच; परंतु आई-वडिलांनी त्यांना आर्थिक भक्कम पाया घडवून दिल्यास शिक्षणासोबत व संस्कारासोबत त्यांचे जीवन उज्ज्वल होईल. तसेच मूलबाळ झाल्यानंतर पती-पत्नीत थोडीफार कुरबुर होतच राहते. परंतु आर्थिक कारणांवरून भांडणे होणार नाहीत व घरखर्च चालेल असे नियोजन करावे. आयकर कायद्यानुसार मुलांच्या ट्युशन फिसची वजावट मिळते व शैक्षणिक कर्जाचीही वजावट मिळते. पती-पत्नी आपल्या स्वत:च्या उत्पन्नातून खर्च झाल्यास ती वजावट घेऊ शकतात; तसेच आई-वडिलांनी मुलांना गिफ्ट दिल्यास मुलांना ते करमाफ होईल.
अर्जुन : मूलबाळ मोठे झाल्यानंतर नटसम्राट व म्हातारपणाची सोय पती-पत्नीने कशी करावी?
श्रीकृष्ण : हे बघ अर्जुना, आई-वडिलांच्या प्रेमाद्वारे मुले मोठी होतील व स्वतंत्र होऊन स्वत:च्या प्रेमाच्या शोधात स्वत:चे कुटुंब वसवतील. यालाच ‘जीवनचक्र’ म्हणतात. पती-पत्नीने स्वत:च्या म्हातारपणाचे नियोजन करताना स्वास्थ्य उत्तम ठेवण्याकडे व आर्थिक सुलभतेकडे लक्ष द्यावे; कारण म्हातारपणात कोणाला पैसे मागणे चांगले वाटत नाही. म्हणून बचत करून बँकेत डिपॉझिट, जमीन, घर इत्यादी पती-पत्नीने जॉइंट नावाने करून आनंदाने राहावे. कारण वयामानाने म्हातारपणात एकमेकांची साथ फार लागते. पती-पत्नीच्या पे्रमापायीच व नातवांच्या प्रेमहट्टापायीच या वयात जीवन सुखकर होते. सिनिअर सिटीजन्सचा लाभ आयकरात ६0 वर्षाच्या वर असल्यास मिळतो. नटसम्राटमधील ‘कुणी घर देतं का.. घर?’ असे होऊ नये म्हणून स्वत:चे घर ‘रिव्हर्स मॉर्टगेज’ स्किममध्ये बँकेकडे ठेवल्यास म्हातारपणात पैसा तर मिळेलच व पती-पत्नी प्रेमाने व आनंदाने स्वत:चा खर्चही भागवू शकतात. ‘नटसम्राट’सारखे सर्व संपत्ती मुलांना देऊन मोकळे होऊ नये.
अर्जुन : जीवनात प्रेमाचे संबंध पती-पत्नीसोबत नंतर मित्र मंडळी व नातेवाइकांसोबतही असतात. त्यांच्यासोबत केलेल्या व्यवहाराचे काय?
श्रीकृष्ण : आयकरात नातेवाइकांची व्याख्या दिलेली आहे. परंतु मित्राची व्याख्या कोणत्याही कायद्यात नाही. नातेवाइकांची निवड मनुष्य करू शकत नाही; परंतु मित्रांची निवड तो स्वत: करू शकतो. मित्र हा प्रेमळ व्यक्ती असतोच आणि तो अडीअडचणीत फार कामाला येतो. नटसम्राटसारखे मित्र असावेत. नातेवाइकांसोबत प्रेमाचे संबंध सदैव असावेत; परंतु पैशाची देवाणघेवाण, गिफ्ट इत्यादी जपून करावेत. ठरावीक नमूद केलेल्या नातेवाइकांकडून मिळालेल्या गिफ्टवर कर लागत नाही; तसेच वडिलोपार्जित संपत्ती इत्यादीचे व्यवहार कायद्यानुसारच करावेत. मित्र मंडळीच्या प्रेमाच्या संबंधात पैसा आणू नये. पैशाचा व्यवहार मित्रासोबत झाल्यास आयकरानुसार ते करपात्र होतील. म्हणजेच हॅण्ड लोन, अ‍ॅडव्हान्स म्हणून मित्रांना पे्रमापायी मदत केल्यास व्यावहारिक दृष्टिकोनातून व्याजाचे उत्पन्न इत्यादी दाखवावे; अन्यथा आयकर कायद्यानुसार अडचण निर्माण होऊ शकते. मित्राकडून गिफ्ट ५0 हजारांच्या वर मिळाल्यास करपात्र होईल.

Web Title: Nut Samrat's travels and 'income tax'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.