Nvidia vs Apple: दिग्गज चिप कंपनी एनव्हिडिया ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे. यासह एनव्हिडियानं आयफोन उत्पादक कंपनी अॅपलला मागे टाकलंय. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एनव्हिडियाचे शेअर बाजार मूल्य ३.५३ ट्रिलियन डॉलर, तर अॅपलचं ३.५२ ट्रिलियन डॉलरवर पोहोचलं आहे.
जून महिन्यात एनव्हीडिया ही काही काळासाठी जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली होती. कंपनीनं मायक्रोसॉफ्ट आणि अॅपलला मागे टाकत ही जागा मिळवली होती. मायक्रोसॉफ्टचे बाजारमूल्य ३.२० ट्रिलियन डॉलर होते.
एनव्हीडियाच्या शेअरमध्ये तेजी
एनव्हिडियाचा शेअर ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत जवळपास १८ टक्क्यांनी वधारला आहे. चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआय या कंपनीने ६.६ अब्ज डॉलर्सच्या फंडिंग राऊंडच्या घोषणेनंतर ही तेजी दिसून येत आहे.
भारतातील करार
एनव्हिडियाला हे यश अशावेळी मिळालंय जेव्हा कंपनीनं भारतीय उद्योजकांसोबत अनेक धोरणात्मक भागीदारी केली आहे. ही भागीदारी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा व्यवसायातील भारताच्या प्रचंड क्षमतेचा फायदा घेण्यासाठी करण्यात आलीये. नुकतेच कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेन्सन हुआंग मुंबईत झालेल्या 'एनव्हीडिया एआय कॉन्फरन्स २०२४' कार्यक्रमाला उपस्थित होते.
रिलायन्स आणि टाटांसोबत डील
एनविडिया रिलायन्सच्या डेटा सेंटर्ससाठी आपले ब्लॅकवेल एआय प्रोसेसर पुरवणार आहेत. याशिवाय कंपनी योट्टा डेटा सर्व्हिसेस आणि टाटा कम्युनिकेशनसारख्या कंपन्यांच्या डेटा सेंटर्ससाठी हॉपर एआय चिप्स देणार आहेत. याशिवाय त्यांनी टेक महिंद्रासोबतही करार केला असून सीओआय सुरू करणार आहेत. हे केंद्र पुणे आणि औरंगाबादमध्ये महिंद्राच्या मेकर्स लॅबमध्ये असतील.