Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५० व्या वर्षी उभारली कंपनी; आता भारतातील सर्वात श्रीमंत महिला; कोण आहेत फाल्गुनी नायर?

५० व्या वर्षी उभारली कंपनी; आता भारतातील सर्वात श्रीमंत महिला; कोण आहेत फाल्गुनी नायर?

नायकाच्या आयपीओमुळे गुंतवणूकदारांची चांदी; लिस्टिंगनंतर बक्कळ कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 01:59 PM2021-11-10T13:59:59+5:302021-11-10T14:01:02+5:30

नायकाच्या आयपीओमुळे गुंतवणूकदारांची चांदी; लिस्टिंगनंतर बक्कळ कमाई

Nykaa Founders Falguni Nayar Wealth Tops 6 5 Billion After Blockbuster Ipo | ५० व्या वर्षी उभारली कंपनी; आता भारतातील सर्वात श्रीमंत महिला; कोण आहेत फाल्गुनी नायर?

५० व्या वर्षी उभारली कंपनी; आता भारतातील सर्वात श्रीमंत महिला; कोण आहेत फाल्गुनी नायर?

ब्युटी आणि फॅशन रिटेलर नायकाचा आयपीओ आज बाजारात आला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. नायकाचा आयपीओ शेअर बाजारात येताच कंपनीच्या संस्थापक फाल्गुनी नायर देश आणि जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत सामील झाल्या. शेअर बाजारात येताच नायकाच्या शेअरच्या मूल्यात ९० टक्के तेजी नोंदवली गेली.

नायकामध्ये फाल्गुनी यांचा निम्मा हिस्सा आहे. नायकाचा आयपीओ शेअर बाजारात येताच फाल्गुनी यांची संपत्ती ६.५ अब्ज डॉलरवर पोहोचली. यामुळे फाल्गुनी देशातील सर्वात श्रीमंत (सेल्फ मेड) महिला ठरल्या. ब्ल्यूमबर्ग बिलिनेयर इंडेक्सच्या आकड्यांवरून ही माहिती समोर आली. एफएसएन ई-कॉमर्स व्हेंचर्स नायकाची पॅरेंट कंपनी आहे. झोमॅटो आणि सोना कॉमस्टारनंतर नायका हा या वर्षातला तिसरा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे.

नायका शेअर बाजारात लिस्ट होताच कंपनीचं बाजार भांडवल १ लाख कोटींच्या पुढे गेलं. इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा अनुभव असलेल्या फाल्गुनी नायर यांनी २०१२ मध्ये नायकाची सुरुवात केली. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत नायकाचं ऍप ५.५८ कोटी लोकांनी डाऊनलोड केलं. आर्थिक वर्ष २०२१ मध्ये नायकाला ६१.९ कोटी रुपयांचा नफा झाला. २०२० मध्ये नायकाला १६.३ कोटींचा तोटा झाला होता. नायकानं आपलं पहिलं दुकान २०१४ मध्ये सुरू केलं. ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत हाच आकडा ८० वर पोहोचला. सध्या देशातील ४० शहरांमध्ये नायकाची दुकानं आहेत.

इन्व्हेस्टमेंट बँकर राहिलेल्या फाल्गुनी नायर यांनी अनेक वर्षे भारतीय कंपन्यांच्या संस्थापकांना भांडवलच्या उभारणीसाठी मदत केली. त्यासाठी त्यांनी युरोप आणि अमेरिकेत रोड शो केले. आयपीओमध्ये लोकांनी गुंतवणूक करावी यासाठी अमेरिका आणि युरोपमध्ये रोड शो केले जातात. २०१२ मध्ये नायर यांनी नायकाची स्थापना केली. आज नायकाचा समावेश देशातील आघाडीच्या ई-कॉमर्स वेबसाईट्समध्ये होतो.

Web Title: Nykaa Founders Falguni Nayar Wealth Tops 6 5 Billion After Blockbuster Ipo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.