Join us  

खरेदीचा टॉप गीअर; सराफ बाजारात २७५ कोटींची उलाढाल, वाहन बाजारही सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 6:13 AM

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळपासून गर्दी केली होती.

मुंबई : गुढीपाडवाच्या निमित्ताने बाजारात खरेदीचा जोरदार उत्साह दिसून आला. सराफ बाजारात दिवसभरात २७५ कोटींची उलाढाल झाली. तर वाहन खरेदीचा गीअरही टॉपला पोहोचला. गेल्या दोन दिवसांत १,३१९ वाहनांची खरेदी झाली. 

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सकाळपासून गर्दी केली होती. सोन्याच्या नाण्यांपेक्षा आभूषणांना पसंती देत आवडीचे दागिने मुंबईकरांनी खरेदी केले. दिवसभरात सोन्याची २७५ कोटींची उलाढाल सराफा बाजारात पाहायला मिळाली. सोन्याचे दर ६० हजारांपर्यंत पोहोचूनही ग्राहकांनी दागिने खरेदी केले. त्यातच थेट जुलैपर्यंत लग्नाचे मुहूर्त असल्याने ग्राहकांनी पाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदी केले.

मंगळसूत्र, सोन्याच्या बांगड्या, हार, नथ, सोनसाखळी अशी आभूषणे ग्राहकांनी खरेदी केली असून, सोन्याच्या दरवाढीचा खरेदीवर परिणाम झाल्याचे दिसले नाही. नवीन सोने खरेदीबरोबरच जुने सोने मोडून नवीन दागिने तयार करण्याकडे लोकांचा कल असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अंधेरीत सर्वाधिक नोंदणीगुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गाडी मिळावी, यासाठी नागरिक वाहन विक्रेत्यांकडे तगादा लावतात. पाडव्याच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आधी गाडी दारात आणण्याची प्रथा रुजत आहे. मुंबई सेंट्रल (ताडदेव), अंधेरी, वडाळा आणि बोरिवली असे चार आरटीओ मुंबई हद्दीत येतात. गुढीपाडव्याला अंधेरी आरटीओत सर्वाधिक अर्थात ४७२ वाहनांची, तर बोरिवलीत आरटीओत ४३० आणि वडाळा आरटीओत २७२ वाहनांची नोंद करण्यात आली. पाडव्याच्या दिवशी अर्थात बुधवार आणि मंगळवारची ही वाहन विक्रीची स्थिती आहे, असे आरटीओतील अधिकाऱ्यांनी सांगितले. ताडदेव आरटीओने पाडव्याच्या दिवशीची आकडेवारी उपलब्ध केलेली नाही.

दोन दिवसांपूर्वी सोन्याचे दर वाढले असून, यंदा २७५ कोटींची उलाढाल झाली आहे. ग्राहकांनी सोन्याबरोबरच चांदीचीदेखील खरेदी केली आहे. सोन्याच्या नाण्यांपेक्षा आभूषणांना पसंती देत आवडीचे दागिने खरेदी केले. सोन्याचे दर वाढले नसते तर ही उलाढाल ४०० कोटींच्या आसपास झाली असती.- कुमार जैन, अध्यक्ष मुंबई ज्वेलर्स असोसिएशन

टॅग्स :सोनं