Join us

10 जुलैपर्यंत सरकार COVID Insurance Policy आणणार, 50 हजारांपासून होणार सुरूवात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 3:15 PM

आयआरडीएने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

ठळक मुद्देया विमा पॉलिसींसाठी एकच प्रीमियम भरावा लागेल, असे आयआरडीएच्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.मानक कोविड विमा पॉलिसी 50 हजार ते पाच लाखांदरम्यान असू शकते.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) ने देशातील विमा कंपन्यांना 10 जुलैपर्यंत अल्पकालीन मानक कोविड वैद्यकीय विमा पॉलिसी (COVID Insurance Policy) किंवा कोविड कवच पॉलिसी (COVID Insurance Policy) आणण्यास सांगितले आहे.

आयआरडीएने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यामध्ये आयआरडीएने म्हटले आहे की, ही विमा पॉलिसी साडेतीन महिने, साडेसहा महिने, साडे नऊ महिने ठेवली जाऊ शकते. तसेच, मानक कोविड विमा पॉलिसी 50 हजार ते पाच लाखांदरम्यान असू शकते. याचबरोबर, अशा पॉलिसींची नावे 'कोरोना आर्मर विमा' असावीत. कंपन्या या नंतर त्यांचे नाव जोडू शकतात.

या विमा पॉलिसींसाठी एकच प्रीमियम भरावा लागेल, असे आयआरडीएच्या या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. याशिवाय, विमा पॉलिसींचे प्रीमियम देशभर एकसारखे असले पाहिजेत. प्रदेश किंवा भौगोलिक स्थानानुसार, या विमा पॉलिसींसाठी विभिन्न प्रीमियम असू शकत नाहीत, असेही यामध्ये म्हटले आहे.

या विमा पॉलिसीमध्ये कोविडच्या उपचारांचा खर्च तसेच इतर कोणत्याही जुना किंवा नवीन आजाराच्या उपचारांचा खर्च समाविष्ट असावा. याअंतर्गत, रुग्णालयात दाखल करणे, घरी उपचार करणे, आयुषपासून उपचार करणे, तसेच रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी खर्च समाविष्ट करण्यात यावा, असे आयआरडीएचे म्हणणे आहे.

दरम्यान, सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांनी 10 जुलै 2020 पूर्वी अशा पॉलिसी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत, असेही आयआरडीएने म्हटले आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापैसा