लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे ‘आयटी’ उद्योगाला ‘वर्क फ्रॉम होम’ कार्यपद्धतीकडे वळावे लागले. मात्र, आता देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने गती घेतली असून, अनेक कर्मचाऱ्यांनी लस घेतल्यामुळे ‘आयटी’ कंपन्याही आता ३० ते ४० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविण्यासाठी तयार झाल्या आहेत.
कोरोना महामारीमुळे ‘आयटी’ क्षेत्रातील कर्मचारी वर्षभराहून अधिक काळ घरातूनच काम करीत आहेत. कर्मचाऱ्यांवर आता याचा परिणाम होऊ लागला असून, बहुसंख्य कर्मचारी कार्यालयांमध्ये जाण्यास उत्सुक आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली आहे. दैनंदिन रुग्णसंख्याही घटत आहे. तसेच लसीकरणही वेगाने होत आहे. त्यामुळे घरातून काम करून कंटाळलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार आहे. कार्यालये पुन्हा सुरू करण्याची तयारी कंपन्यांनी सुरू केली आहे.
हायब्रिड वर्क मॉडेल वापरणार
संपूर्ण क्षमतेने कार्यालये सुरू करणे सध्या शक्य हाेणार नाही. मात्र, अनेक कंपन्या ३० ते ४० टक्के कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलाविण्यासाठी तयार आहेत. यासाठी कंपन्या ‘हायब्रिड वर्क मॉडेल’चा वापर करण्याची तयारी करीत आहेत. काही कर्मचारी कार्यालयात, तर काही कर्मचारी वर्क फ्रॉम होम असे हे मॉडेल आहे.