- लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अनेक महिन्यांपासून चर्चेत असणारा वस्तू व सेवा कर (जीएसटी) नेमका कसा असणार याची पहिली झलक शुक्रवारी पाहायला मिळाली. जीएसटीमुळे ‘कहीं खुशी, कहीं गम’ अशी परिस्थिती आहे. व्यापारी आणि सामान्य नागरिकसुद्धा त्यांच्याशी निगडित वस्तूंचे भाव वाढणार की कमी होणार याची माहिती मिळवू लागले. तरुणांसाठी मात्र निराशा करणारे संकेत आहे. कारण दूरसंचार क्षेत्रावर (टेलकॉम) जीएसटी लागू झाल्यावर १८ टक्के कर लागणार आहे. म्हणजे सध्याच्या १५ टक्के करापेक्षा ३ टक्क्यांनी तो जास्त आहे.याचा परिणाम म्हणजे मोबाईल बिलात वाढ होणार आहे. त्याबरोबरच इंटरनेट पॅकच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे वर्षभर मोफत ४-जी इंटरनेट वापरणाऱ्यांना जुलैनंतर ‘आॅनलाईन’ राहण्यासाठी अतिरिक्त पैसे खर्च करावे लागू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर महिन्याकाठी ग्राहकांना ५०० रुपये मोबाईल बिल येत असेल तर जीएसटी लागू झाल्यावर त्या ग्राहकास १५ रुपये जास्तीचे भरावे लागतील. करवाढीचा परिणाम मोबाईल रिचार्जवरसुद्धा दिसून येणार आहे. आतापर्यंत १०० रुपयांच्या रिचार्जवर ८४ ते ८५ रुपये टॉक टाईम मिळत असे. तो १८ टक्के करामुळे ८२ रुपयेच मिळेल. सध्या डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर साधारणत: १४-१५ टक्के कर लागतो. ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर १२ टक्के करावा, अशी या क्षेत्राद्वारे मागणी केली जात होती. मात्र, शुक्रवारी केलेल्या घोषणेनुसार जीएसटी लागू झाल्यावर डेस्कटॉप आणि लॅपटॉपवर १८ टक्के कर बसणार आहे. संगणकाशी संबंधित विविध उत्पादने, जसे प्रिंटर, टोनर, मॉनिटरवर २८ टक्के कर आकारला जाईल. डिजिटल कॅमेऱ्यावर असणारा २५ टक्के कर २८ टक्के होणार आहे. म्हणजे फोटोग्राफीप्रेमींना कॅमेरा विकत घेण्यासाठी सध्यापेक्षा अधिक पैसे मोजावे लागतील.स्मार्टफोन महागणारजुलै महिन्यात कॉलेज सुरू झाल्यावर नवीन स्मार्टफोन घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नवउमेदी तरुण व पालकांनाही जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. मोबाईल निर्मितीवर सरसकट १२ टक्के कर लावण्यात आला आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनुसार मोबाईलच्या किमतींमध्ये जीएसटीमुळे ४ ते ५ टक्क्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे १ जुलैपूर्वीच मोठ्या प्रमाणात मोबाईल खरेदी केली जाईल, असा अंदाज शहरातील स्मार्टफोन विक्रेत्यांनी वर्तविला आहे.