Join us  

तेल रशियाचे, कमाई भारताची; भारताने तेल विक्रीत सौदीलाही टाकले मागे; नफाही कमावला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 1:10 PM

मे २०२३ मध्ये यात आणखी वाढ होत हा आकडा तब्बल ३.६० लाख बॅरल प्रतिदिनवर पोहोचला आहे.

नवी दिल्ली : एकीकडे रशिया युक्रेन युद्ध सुरू असताना भारताने मात्र आपला व्यवसाय आणि मुत्सद्दीपणाचे चातुर्य दाखवून एक नवीन यश संपादन केले आहे. सध्या भारत युरोपीय देशांना सौदी अरेबियापेक्षा जास्त तेल विकत असून, त्यातून मोठा नफा कमावत आहे. 

‘द सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर’च्या म्हणण्यानुसार, युक्रेन-रशिया युद्धापूर्वी युरोप भारताकडून प्रतिदिन १.५४ लाख बॅरल शुद्ध तेल खरेदी करत असे; परंतु आता हा आकडा वाढून २ लाख बॅरल प्रतिदिन झाला आहे. मे २०२३ मध्ये यात आणखी वाढ होत हा आकडा तब्बल ३.६० लाख बॅरल प्रतिदिनवर पोहोचला आहे.

जी ७ देशांचा दबाव झुगारला -जेव्हा भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यास सुरुवात केली, तेव्हा अमेरिका आणि युरोपीय देशांनी भारतावर दबाव टाकण्यास सुरुवात केली आणि जी ७ देशांनी रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यावर किंमत मर्यादा घातली. असे असतानाही भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवले नाही. भारताने रशियाकडून कच्चे तेल विकत घेतले, ते इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम इतर रिफायनरीजमध्ये शुद्ध करत ते युरोपियन बाजारपेठेत विकण्यास सुरुवात केली.

किती कोटी लीटर शुद्ध तेलाची निर्यात? - भारत युरोपला सुमारे ५.५. कोटी लिटर शुद्ध तेलाची निर्यात करत आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये जेव्हा रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हा अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले होते. - युक्रेन युद्धामुळे मार्च २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतिबॅरल १४० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत वाढली होती. त्यानंतर अमेरिकेने कच्च्या तेलाचा साठा आंतरराष्ट्रीय बाजारासाठी खुला केला होता.

भारतावर कारवाईची धमकीरशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून ते युरोपीय देशांना विकण्यावरून युरोपीय देशांनी भारतावर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करण्यास काही आमची तक्रार नसून, तेच तेल शुद्ध करून आम्हाला विकणे चुकीचे आहे. त्यामुळे भारतावर कारवाई करायला हवी, असे युरोपीयन संघाने इशारा देताना म्हटले आहे.

भारताचे प्रत्युत्तरयुरोपीय संघाचे परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांनी तेल विक्रीवरून भारतावर टीका केल्यानंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, बोरेल यांनी प्रथम युरोपीय संघ परिषदेचे नियम पाहावेत. रशियन कच्चे तेल मोठ्या प्रमाणात तिसऱ्या देशात वळवले गेले आहे आणि आता ते रशियन मानले जात नाही.

सहा महिन्यांत किती कोटी रुपयांची तेल आयात? संधीचा फायदा घेत भारताने रशियाकडून कच्चे तेल विकत घेऊन त्याचे शुद्धीकरण करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करण्यास सुरुवात केली. २०२१-२२ या वर्षात भारताने रशियाकडून १८ हजार कोटी रुपयांचे कच्चे तेल खरेदी केले होते. नंतर हा आकडा आणखी वाढला. २०२२-२३ च्या पहिल्या सहा महिन्यांत रशियाकडून भारताची तेल आयात ८९ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.

भारतावर किती परिणाम झाला? आर्थिक निर्बंधांमुळे रशियाची तेल निर्यात थांबली होती; कारण अमेरिकेनेही रशियन तेलखरेदीवर बंदी घातली होती. मात्र, भारताने त्या निर्बंधांकडे दुर्लक्ष करून रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू केली. यापूर्वी भारत कच्च्या तेलाच्या गरजेपैकी ६०% आखाती देशांकडून व फक्त २% रशियाकडून खरेदी करीत असे.

किती टक्के जास्त तेल आयात? या काळात चीनने रशियाकडून कच्चे तेल, पाइपलाइन गॅस, कोळसा, एलएनजी, तेल उत्पादने आणि रसायने आयात केली, तर भारताने केवळ कच्चे तेल, कोळसा आणि रसायने आयात केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत रशियातून भारतात आयात होणाऱ्या कच्च्या तेलात ३८६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. 

टॅग्स :भारतखनिज तेलपेट्रोलडिझेलरशिया