Join us

एक शोध अन् देशाचं नशीबच बदललं! भारताच्या तुलनेत 6 पट ग्रोथ, 5 वर्षांत 4 पट वाढली अर्थव्यवस्था!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 9:50 PM

आता या देशात शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च वाढवला जात आहे.

जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये, भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पण, जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था कोणती? हे आपल्याला माहीत आहे का? तर याचे उत्तर आहे गयाना. 2018 पासून हा देश जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. गेल्या पाच वर्षांत या देशाची अर्थव्यवस्था सरासरी 27.14 टक्क्यांनी वाढली आहे आणि आता यावर्षात ती 38 टक्के एवढ्या प्रचंड वेगाने वाढणे अपेक्षित आहे. IMF नुसार, या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.1 टक्क्याने वाढू शकते. अर्थात, गयानाच्या अर्थव्यवस्थेचा वेग भारताच्या तुलनेत सहापटहून अधिक आहे.

दक्षिण अमेरिकेच्या उत्तर अटलांटिक किनार्‍यावर वसलेला गयाना हा 2015 पर्यंत जगातील सर्वात गरीब देशांमध्ये गणला जात होता. मात्र, त्याच वर्षी एक्सॉन मोबिल कॉर्पोरेशनने (Exxon Mobil Corporation) गयानापासून 100 मैल दूर तेलाचे मोठे साठे शोधून काढले. यातून, गयानाला दरवर्षी सुमारे 10 अब्ज डॉलर मिळणे अपेक्षा आहे. असे झाल्यास, 2040 पर्यंत, त्याच्या खजिन्यातून सुमारे 157 अब्ज डॉलर जमा होऊ शकतात.

एक्सॉन आणि तिच्या पार्टनर कंपन्यांनी गेल्या वर्षी गयानामधील तेल उत्पादनातून 5.8 अब्ज डॉलर कमावले होते. याच वर्षात, एक्सॉनने गयानाच्या तेल प्रकल्पावर 12.7 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती.

तेलानं नशीबच बदललं - केवळ तेलाच्या एका शोधाने गयानाचा चेहरामोहरा बदलला आहे. या देशाची अर्थव्यवस्था गेल्या पाच वर्षांत तब्बल चौपट वाढली आहे. गयानाची लोकसंख्या अवघी आठ लाख आहे आणि त्या तुलनेत तेलाचा साठा खूप अधिक आहेत. येत्या काही दिवसांत, गयाना कुवेतलाही मागे टाकून जगातील सर्वात मोठा दरडोई क्रूड उत्पादक देश बनू शकतो, असे मानले जात आहे. गयाना हा दक्षिण अमेरिकेतील इंग्रजी भाषा बोलली जाणारा एकमेव देश आहे. आता येथे शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च वाढवला जात आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्थाअमेरिकाभारतखनिज तेल