Join us

तेल कंपन्यांनी कमावला ८१ हजार कोटींचा नफा; तेलसंकट कालखंडाच्या तुलनेत कमाई दुपटीपेक्षा अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 9:17 AM

कंपन्यांनी शेअर बाजाराकडे सादर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तेलविक्रीतून सरकारी कंपन्यांना वर्षभरात तब्बल ८१ हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिडेट या कंपन्यांना तेलसंकटाआधीच्या वर्षाच्या तुलनेत कितीतरी अधिक नफा झाला आहे. कंपन्यांनी शेअर बाजाराकडे सादर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.

या तिन्ही कंपन्यांचा तेलसंकट निर्माण होण्याआधीच्या काळातील वार्षिक नफा ३९,३५६ कोटी इतका होता. या तुलनेत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या काळात कंपन्यांना झालेला निव्वळ नफा दुपटीपेक्षा अधिक आहे. तिन्ही कंपन्यांनी एकत्रितपणे या वर्षात सर्वाधिक नफा कमावला आहे. 

२०२२ मध्ये झाला २१,२०१ कोटी रुपयांचा तोटा 

२०२२-२३ मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात या तिन्ही कंपन्यांसाठी ३० हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. नंतर घट करून ही रक्कम १५ हजार कोटी इतकी करण्यात आली होती. देशात होणाऱ्या एकूण इंधनविक्रीमध्ये या तिन्ही कंपन्यांचा वाटा ९० टक्के इतका आहे. या तिन्ही कंपन्यांनी मागील दोन वर्षांत पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किमतीत कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. उत्पादनखर्च वाढल्याने तिन्ही कंपन्यांना एप्रिल-सप्टेंबर २०२२ मध्ये एकत्रितपणे २१,२०१ कोटींचा तोटा सहन करावा लागला होता.

कोणत्या कंपनीचा किती नफा?

कंपनीचे नाव     २०२३-२४    २०२२-२३    २०२१-२२ आयओसी     ३९,६१८.८४    ८,२४१.८२    २४,१८४ बीपीसीएल     २६,६७३.५०    १,८७०.१०     ८,७८८.७३एचपीसीएल     १४,६९३.८३    ८,९७४.०३    ६,३८२.६३ 

टॅग्स :व्यवसाय