- चिन्मय काळे
मुंबई : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम नियोजन विभागाने (पीपीएसी) निश्चित केलेल्या दरांपेक्षा सरकारी तेल कंपन्या पेट्रोल ३.०८ व डिझेल ५.८९ रुपये अधिक दराने विक्री करीत आहेत. पीपीएसीनुसार खनिज तेलाचा दर ७७.१८ डॉलर प्रति बॅरल (१५९ लिटर) आहे. तेल कंपन्या मात्र पेट्रोलसाठी ८४.१९ व डिझेलसाठी ९०.५८ डॉलर प्रति बॅरल दरानुसार इंधनाची किंमत ठरवत आहेत.
पेट्रोल-डिझेलचे भाव भडकल्याने नागरिकांची होरपळ सुरू झाली आहे. आंतरराष्टÑीय स्तरावर खनिज तेल महागल्याने इंधनाचे दर वाढल्याचा दावा कंपन्या करीत आहेत. वास्तवात हे दर फार वाढलेले नाहीत. आंतरराष्टÑीय नियमांनुसार, भारताला तीन महिने आधीच्या दराने खनिज तेल खरेदी करावे लागते. सध्या भारतीय तेल कंपन्या जुलै २०१८ च्या दराने तेल खरेदी करीत आहेत. त्यावेळी खनिज तेल ७३.४७ डॉलर प्रति बॅरल होते. समुद्रीमार्गे या तेल वाहतुकीचा खर्च ४.२० ते ५ डॉलर प्रति बॅरल असतो. हा सर्व खर्च पकडूनच पीपीएसीने ७७.१८ डॉलरनुसार पेट्रोल-डिझेलची विक्री व्हायला हवी, असे परिपत्रकात म्हटले आहे. तेल कंपन्या मात्र त्यापेक्षा अधिक दराने इंधनाची विक्री करीत आहेत. यासंदर्भात तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी, ‘पीपीएसी’ ने काय दर निश्चित केला, याच्याशी आम्हाला घेण-देणे नाही, असे उत्तर दिले.