नवी दिल्ली : पेट्रोल - डिझेलच्या दराचा दररोज घेतला जाणारा आढावा २० दिवसांपासून बंद करण्यात आल्यामुळे तेल वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रतिलिटर ४ रुपये आणि डिझेलच्या विक्रीवर प्रतिलीटर २ रुपये तोटा सहन करावा लागत आहे. सुत्रांनी सांगितले की, या २० दिवसांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोलचा दर वाढून मुंबईत किमान १०३ रुपये लिटर, इतर अनेक शहरांत १०० रुपये लीटर व्हायला हवा होता. तथापि, ही दरवाढ रोखण्यात आली आहे. त्यामुळे कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे. प्राप्त माहितीनुसार, पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर २७ फेब्रुवारीपासून कंपन्यांनी इंधन दरवाढ रोखून धरली आहे. या काळात कच्च्या तेलाचे दर ६४.६८ डॉलर प्रतिबॅरलवरून ६६.८२ डॉलरवर गेले आहेत. मध्ये तर ते ६८.४२ डॉलर झाले होते. या काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाही घसरून ७२,५७ वर गेला आहे. १७ फेब्रुवारी रोजी राजस्थानातील श्रीगंगानगर येथे पेट्रोल सर्वप्रथम १०० रुपये लीटर झाले होते. त्यानंतर इतरही अनेक शहरांत पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली होती. सर्वच राज्यात पेट्रोल ९० रुपयांच्या वर गेलेले आहे. मात्र प्रिमिअम पेट्रोलचे दर आणखी जास्त आहेत.
कच्च्या तेलाच्या दरामध्ये झाली वाढएका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, इंधन दर ठरविण्यासाठी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या दराची मागील १५ दिवसांची सरासरी विचारात घेतात. ही सरासरी वाढलेली आहे. ब्रेंट क्रुडच्या किमती बुधवारपासून कमी होत असल्या तरी कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर प्रतिलीटर ४ रुपये आणि डिझेलच्या विक्रीवर २ रुपये तोटा होत आहे. स्वयंपाकाच्या गॅसवरही कंपन्यांना तोटा सहन करावा लागत आहे.