लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०३० पर्यंत जगात खनिज तेल, गॅस आणि कोळसा यांची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचेल, असे ‘आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थे’ने (आयईए) म्हटले आहे.
२०३० नंतर या तिन्ही इंधनांची मागणी घटायला सुरूवात होईल, असेही आयईएने म्हटले आहे. आयईएने जारी केलेल्या ‘वार्षिक जागतिक ऊर्जा अंदाज’ नामक अहवालात म्हटले आहे की, २०३० पर्यंत रस्त्यावर मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहने आलेली असतील. त्यामुळे तेलाची मागणी कमी होण्यास सुरूवात होईल. तोपर्यंत चिनी अर्थव्यवस्थेचा वृद्धी दरही धिमा झालेला असेल. आयईएने म्हटले की, २०५० पर्यंत भारतात विजेची मागणी ९ पट वाढेल. आगामी ३ दशकांत भारतातील ऊर्जेची मागणी जगातील कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक असेल.
‘ओपेक’चा अंदाज उलट
तेल उत्पादक व निर्यातदार देशांची संघटना ‘ओपेक’ने मात्र याच्या अगदी विरुद्ध अंदाज व्यक्त केला आहे. याच महिन्यात जारी केलेल्या एका अहवालात ओपेकने म्हटले की, २०३० नंतर तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल. तिच्या पूर्ततेसाठी तेल क्षेत्रात लक्षावधी अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे.