नवी दिल्ली : ‘फेम इंडिया’ योजनेअंतर्गत हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहनाद्वारे २०२० पर्यंत देशाच्या तेल आयातीवरील खर्चात वर्षाला ६० हजार कोटी रुपयांची बचत होईल. ही माहिती अवजड उद्योग मंत्रालयातील अतिरिक्त सचिव अंबुज शर्मा यांनी येथे गुरुवारी वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.फेम इंडिया योजना यशस्वी झाल्यास २०२० पर्यंत भारताच्या तेल आयातीच्या खर्चात वर्षाला ६० हजार कोटी रुपयांची बचत होईल. हायब्रीड आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या मेळाव्यादरम्यान अवजड उद्योग खात्याचे मंत्री अनंत गिते वार्ताहरांशी बोलताना म्हणाले की, ‘आम्ही पहिल्या दोन वर्षांत ८०० कोटी रुपये खर्च करू. ही योजना यशस्वी करण्यासाठी आम्हाला १४ हजार कोटी रुपयांची गरज आहे. हा खर्च केल्यानंतर आम्ही वर्षाला ६० हजार कोटी रुपयांच्या इंधनाची बचत करू शकू.’ जागतिक बाजारात तेलाच्या किमती घटल्यामुळे आणि मागणी कमी असल्यामुळे यावर्षी भारताच्या तेल आयातीचा खर्च ३५ टक्क्यांनी कमी होऊन ७३ अब्ज डॉलर असेल असा अंदाज आहे.भारताने २०१४-२०१५ मध्ये ६.८७ लाख कोटी रुपये खर्चून १८.९४ कोटी टन कच्चे तेल आयात केले होते. या आर्थिक वर्षात ते १८.८२ कोटी टन असेल असा अंदाज आहे.
तेल आयातीवरील खर्च ६० हजार कोटींनी घटणार
By admin | Published: November 27, 2015 12:01 AM