Join us

तेल, नैसर्गिक वायू, कोळसा २० टक्क्यांनी महागण्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 1:03 AM

वाढती मागणी आणि उत्पादनातील कपात यामुळे दरवाढ होत आहे.

वॉशिंग्टन : यंदा ऊर्जा क्षेत्रातील कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा या उत्पादनाच्या किमतीत २० टक्के वाढ अपेक्षित असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. या दरवाढीचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो, असेही जागतिक बँकेने नमूद केले आहे.जागतिक बँकेने ‘एप्रिल कमॉडिटी मार्केटस् आऊटलूक’ या अहवालात म्हटले आहे की, २०१८ मध्ये कच्च्या तेलाच्या किमती सरासरी ६५ डॉलर प्र्रतिबॅरल राहतील. २०१७ मध्ये त्या ५३ डॉलर प्रतिबॅरल होत्या. वाढती मागणी आणि उत्पादनातील कपात यामुळे दरवाढ होत आहे. याच कारणांमुळे धातूंच्या किमतीत ९ टक्के तर कृषी उत्पादनांत २ टक्के दरवाढ अपेक्षित आहे. जागतिक बँकेचे विकास अर्थशास्त्र विभागाचे वरिष्ठ संचालक तसेच हंगामी मुख्य अर्थतज्ज्ञ शांतायनन देवराजन यांनी सांगितले की, बहुतांश वस्तूंच्या दरवाढीमागे जागतिक वृद्धीला मिळालेली गती आणि वाढती मागणी ही प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे आम्ही आगामी वर्षासाठी वाढीव किमतीचा अंदाज देत आहोत. (वृत्तसंस्था)तेलाच्या वापरात ११%ने वाढजागतिक बँकेने म्हटले की, २०१८ च्या पहिल्या तिमाहीत जगाचा तेल वापर १.६ टक्क्यांनी वाढला. याच काळात भारताचा तेल वापर मात्र तब्बल ११ टक्क्यांनी वाढला आहे. या काळात कोळशाच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या. या दरवाढीला चीनचा वाढता कोळसा वापर जबाबदार आहे.याशिवाय घटलेले उत्पादनही काही प्रमाणात कारणीभूत आहे. आगामी दशकात कोळशाचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय युरोपीय देशांनी घेतला आहे. या काळात भारताचा कोळसा वापर मात्र शिखरावर जाणार असल्याचे धोरणांवरून दिसते.

टॅग्स :अर्थव्यवस्था