सिंगापूर : जास्तीच्या पुरवठ्याच्या भीतीमुळे गेल्या आठवड्यात येथील बाजारात खाली आलेल्या तेलाच्या किमती सोमवारी किंचित सावरल्या. यावर्षी चीनने सहाव्यांदा व्याजदरात कपात केल्याचे गेल्या शुक्रवारी जाहीर केल्यानंतर बाजारावर काहीही परिणाम झाला नाही.जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनच्या आर्थिक विकासाचा दर खालावलेला आहे. टिकाऊ वस्तूंसाठी किती मागणी आहे, तिसऱ्या तिमाहीतील सकल देशी उत्पादन (जीडीपी), व्यवसायातील आत्मविश्वास आणि युरोपियन युनियनकडून बेरोजगारीची आकडेवारी या आठवड्यात तेलाच्या किमतीचा कल स्पष्ट करील, असे आशिया-पॅसिफिक आॅईल अँड गॅस प्रॅक्टिसचे प्रमुख संजीव गुप्ता यांनी सांगितले. या आठवड्यात अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हची बैठक व्याजदरासंदर्भात होणार असून गुंतवणूकदारांचे या बैठकीकडे लक्ष आहे. ही बँक नव्या वर्षापर्यंत व्याजदर वाढवणार नाही अशी त्यांची अपेक्षा आहे. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे तेल (डिसेंबर डिलिव्हरी) १३ सेंटस्ने वधारून ४४.७३ अमेरिकन डॉलरवर, तर ब्रेंटचे कच्चे तेल (डिसेंबर डिलिव्हरी) १० सेंटस्ने महाग होऊन ४८.०९ अमेरिकन डॉलरवर गेले होते.
सिंगापूरच्या बाजारात तेल वधारले
By admin | Published: October 26, 2015 11:24 PM