सिंगापूर : तेल उत्पादन आणि वितरण क्षेत्रात प्रमुख भूमिका असलेल्या सौदी अरबने तेहरानसोबतचे राजनैतिक संबंध तोडल्याने आशियात आज सोमवारी तेलाच्या भावाने चांगलीच उसळी घेतली.एका धर्मगुरूला मृत्युदंड ठोठावण्यात आल्याने इराणमधील सौदी अरबच्या दूतावासावर निदर्शकांनी केलेल्या हल्ल्यानंतर सौदी अरबने इराणसोबतचे राजनैतिक संबंध तोडण्यात आल्याची घोषणा केली. सौदी अरबला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही इराणच्या नेतृत्वाने दिला आहे. सौदी अरब आणि इराणदरम्यान तणाव वाढल्याने आधीच अस्थिर असलेली मध्य-पूर्वेतील (नैऋत्य आशिया) स्थिती आणखी चिघळण्याची भीती आहे. अमेरिकेत फेब्रुवारीत वितरित करण्यात येणाऱ्या तेलाचा भाव ४८ सेंटस्ने वाढत ३७.५२ डॉलरवर गेला, तर ब्रेन्ट क्रूडचा भावही ६१ सेंटस्ने वाढत ३७.८९ डॉलरवर गेला.मध्य-पूर्वेतील राजकीय तणाव आणखी चिघळण्याच्या शक्यता पाहता तेलाचा पुरवठा विस्कळीत होणाऱ्या शक्यता बळावल्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीला तेलाचे भाव वधारले, असे सिंगापूरस्थित आयजी मार्केटस्चे जाणकार बर्नार्ड यांनी सांगितले. भाव वधारले असले तरी जागतिक पातळीवर पुरवठा एकंदरीत सुरळीत असल्याने दीर्घावधीत तेलाचे भाव आटोक्यात राहतील, असेही त्यांनी म्हटले आहे. पेट्रोलियम निर्यात देशांच्या संघटनेत सौदी अरब हा सर्वात मोठा तेल उत्पादक देशआहे.
पश्चिम आशियातील तणावाने तेल तेजीत
By admin | Published: January 05, 2016 12:17 AM