मुंबई : अमेरिकेने इराणविरुद्ध लादलेले व्यापार निर्बंध ४ नोव्हेंबरपासून अंमलात येतील व त्यानंतर भारताला इराणकडून कच्चे तेल डॉलरऐवजी रुपयात मिळू लागेल. यासाठी केंद्र सरकारने आयडीबीआय बँक व युको बँकेची नेमणूक केली आहे.इराणमधून दररोज १२ लक्ष बॅरल कच्च्या तेलाची निर्यात होते. अमेरिकन निर्बंधानंतर ही निर्यात थांबणार आहे. त्यामुळे इराणला नवे ग्राहक शोधावे लागणार आहेत. भारतातील इंडियन आॅइल कॉर्पोरेशन, मंगलोर रिफायनरीज व नायरा एनर्जी (पूर्वीची एस्सार आॅइल) या कंपन्या इराणचे जुने ग्राहक आहेत.इराणकडून मिळणाऱ्या कच्च्या तेलासाठी भारतीय कंपन्यांना वाहतूक खर्च कमी लागतो; शिवाय दोन महिन्यांची उधारी मिळते. त्यामुळे सप्टेंबरमध्ये इराणकडून आयात झालेल्या तेलाचे पैसे नोव्हेंबरमध्ये द्यावे लागतील. त्या वेळी अमेरिकन निर्बंध लागू झालेले असतील म्हणून डॉलरमध्ये पैसे देणे बंधनकारक राहणार नाही. त्यामुळे इराण भारताकडून रुपयात पैसे घेईल. याच पैशाचा उपयोग इराण भारताकडून आयात होणाºया मालाची किंमत रुपयात चुकवून करेल.अमेरिकेत आयडीबीआय बँक व युको बँक यांच्या शाखा नाहीत. त्यामुळे सरकारने इराणला रुपयात पैसे देण्यासाठी या दोन बँकांची निवड केली आहे. इराणविरुद्ध व्यापार निर्बंध लावल्यानंतर इराणशी व्यापार करण्यास अमेरिकेने भारताला परवानगी कशी दिली याबद्दल आंतरराष्टÑीय व्यापार वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
डॉलरऐवजी रुपये मोजून इराणकडून घेणार तेल, नोव्हेंबरपासून होणार अंमलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 4:03 AM