नवी दिल्ली : राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म ओला कॅब्सचे सीईओ (Ola Cabs) हेमंत बक्षी यांनी राजीनामा दिला आहे. यासंदर्भात सुत्रांनी माहिती दिली आहे. हेमंत बक्षी यांनी पद स्वीकारल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत राजीनामा दिला आहे. याशिवाय, जवळपास 10 टक्के कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकण्याचीही योजना आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कंपनीला पुनर्रचना प्रक्रियेतून जाण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे किमान 10 टक्के कर्मचाऱ्यांवर परिणाम होईल. गेल्या वर्षी ओलाने 'पुनर्रचनेचा' भाग म्हणून ओला कॅब्स, ओला इलेक्ट्रिक आणि ओला फायनान्शियल सर्व्हिसेस वर्टिकलमधून जवळपास 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते.
जानेवारीमध्ये ओलाची मूळ कंपनी एएनआय टेक्नॉलॉजीसने (ANI Technologies) युनिलिव्हरचे माजी कार्यकारी अधिकारी हेमंत बक्षी यांची कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली होती. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन सीईओची नियुक्ती होईपर्यंत कंपनीचे संस्थापक भाविश अग्रवाल हे पदभार सांभाळतील.
या देशांमधून आपला व्यवसाय बंद केलाया महिन्याच्या सुरुवातीला ओलाने वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यूके, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील सर्व विद्यमान जागतिक बाजारपेठा बंद करत असल्याची घोषणा केली होती. तसेच, देशात विस्ताराची मोठी संधी दिसत असल्याने कंपनी भारतीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगण्यात आले होते.