Join us

७२ ते ७६ रुपयांदरम्यान असेल OLA Electric IPO चा प्राईज बँड, १ ऑगस्टला खुला होणार, GMP ही वाढला 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:54 AM

लोकप्रिय असलेल्या ई-स्कूटर मॅन्युफॅक्चरर कंपनी ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ ओपन होणार आहे. पाहूया किती आहे याचा प्राईज बँड आणि संपूर्ण डिटेल्स.

OLA Electric IPO: लोकप्रिय असलेल्या ई-स्कूटर मॅन्युफॅक्चरर कंपनी ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ ओपन होणार आहे. ओला इलेक्ट्रिकनं आयपीओसाठी ७२ ते ७६ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केलाय. सोमवारी कंपनीनं या प्राइस बँडची माहिती देण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली. ओला इलेक्ट्रिक हा या वर्षातील सर्वात मोठा आयपीओ असेल. सॉफ्ट बँकेनंही कंपनीत पैसे गुंतवले आहेत. जाणून घेऊया ग्रे मार्केटसह इतर डिटेल्स.

कर्मचाऱ्यांना मिळणार सूट

फायनान्शियल एक्स्प्रेसमध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार, कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड ७२ ते ७६ रुपये प्रति शेअर असेल. कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना एका शेअरवर ७ रुपयांची सूट देणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांचं उत्पादन करणारी पहिली भारतीय कंपनी आपला आयपीओ आणत आहे. या आयपीओची साईज ७४० मिलियन डॉलर्स असू शकते.

ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ २ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट दरम्यान किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला असेल. तर अँकर गुंतवणूकदार (मोठे गुंतवणूकदार) १ ऑगस्टला आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकतील.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओवर फिडेलिटी, नोमुरा आणि नॉर्जेस बँक गुंतवणूक करू शकतात. कंपनी नवीन शेअर्स जारी करून ६६० मिलियन डॉलर्स उभारण्याचा प्रयत्न करेल. कंपनीचे संस्थापक भावेश अग्रवाल देखील सुमारे ८० दशलक्ष डॉलर्सची हिस्सा कमी करतील. कंपनीने दिलेल्या जाहिरातीनुसार आयपीओच्या १० टक्के हिस्सा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?

इन्व्हेस्टर गेनच्या अहवालानुसार, ग्रे मार्केटमध्ये ओला इलेक्ट्रिकआयपीओची कामगिरी चांगली दिसत आहे. कंपनीचा आयपीओ आज १५ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत आहे. २७ जुलै रोजी तो १४ रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत होता.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारओला