Bhavish Aggarwal : इलेक्ट्रिक दुचाकींच्या क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या ओला इलेक्ट्रिक कंपनीचे सध्या वाईट दिवस सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून ओला कंपनी सातत्याने चर्चेत येत आहे. एकीकडे कंपनीचा शेअर उच्च पातळीपासून सुमारे ४३ टक्क्यांनी घसरला आहे. तर दुसरीकडे, बजाज ऑटो (Bajaj Auto) आणि टीव्हीएस मोटर्स (TVS Motors) त्यांचा बाजारातील हिस्सा वेगाने काढून घेत आहेत. कंपनीवर सातत्याने खराब ग्राहक सेवेचा आरोप होत आहे. सोशल मीडियावर यावरुन वादंग माजला होता.
नुकतेच कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Aggarwal) आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक चकमक उडाली होती. आता ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींमुळे कंपनीला कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही नोटीस केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) पाठवली आहे.
ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडून ओलाला नोटीसओला इलेक्ट्रिक कंपनी शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर जोरदार कामगिरी केली. त्यांचे शेअर्स ७६ रुपयांवर लिस्ट झाले आणि १५७.४ रुपयांवर पोहोचले. पण, त्यानंतर सुरू झालेली घसरण आजतागायत थांबलेली नाही. आता बिझनेस टुडेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, खराब सेवेच्या हजारो तक्रारींवर कारवाई करत सीसीपीएने ओला इलेक्ट्रिकला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारच्या संघटनेचे हे पाऊल कंपनीसाठी मोठा धक्का आहे.
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर १०,६४४ तक्रारीकंपनीने ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या अनेक कलमांचे उल्लंघन केल्याचं नोटीसमध्ये सीसीपीएने म्हटले आहे. यामध्ये खराब सेवा, चुकीच्या जाहिराती, अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आणि ग्राहक हक्कांचे उल्लंघन यांचा समावेश आहे. CCPA ने कंपनीला उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. माहितीनुसार, ग्राहक व्यवहार विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर गेल्या वर्षभरात कंपनीविरोधात १०,६४४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ओला स्कूटरच्या खराब सेवेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
काय आहेत ग्राहकांच्या समस्या?मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असलेल्या स्कूटर्सची विक्री केल्याचा आरोपही कंपनीवर आहे. बुकिंग रद्द केल्यावर रिफंड देण्यास टाळाटाळ करण्यात येते. सर्विसनंतरच्या समस्या, बॅटरी आणि पार्ट्सशी संबंधित तक्रारींचा यात समावेश आहे. विभागाच्या सचिव निधी खरे यांनी याला दुजोरा देत सीसीपीए या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले. कंपनी लवकरच या समस्यांचे निराकरण करेल अशी आम्हाला पूर्ण आशा आहे. सध्या या प्रकरणावर ओला इलेक्ट्रिकने मौन बाळगले आहे.