Ola Electric IPO Opens Today : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकचा पब्लिक इश्यू आजपासून म्हणजेच २ ऑगस्टपासून सुरू होत आहे. गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये (Ola Electric IPO Opens Today) ६ ऑगस्टपर्यंत पैसे गुंतवता येतील. आयपीओच्या माध्यमातून कंपनीला ६,१४५.५६ कोटी रुपये उभे करायचे आहेत. आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून २,७६३.०३ कोटी रुपये गोळा केले होते. इलेक्ट्रिक वाहन कंपनीचा हा देशातील पहिलाच आयपीओ आहे. इश्यू उघडण्यापूर्वीच कंपनीच्या शेअर्सचं ग्रे मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू झालंय.
investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, ग्रे मार्केटमध्ये आयपीओच्या अपर प्राइस बँडमध्ये ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स १७.११ टक्क्यांच्या प्रीमिअमवर व्यवहार करत होते. या आधारावर ८९ रुपयांच्या किमतीत शेअर्सचं लिस्टिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे प्राईज बँड, लॉट साईज (Ola Electric IPO Price Band)
OLA Electric IPO साठी प्राईज बँड (Ola Electric IPO Price Band) ७२-७६ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे. याशिवाय एका लॉटमध्ये १९५ शेअर्स असतील. कंपनी ५५०० कोटी रुपयांचे ७२.३७ कोटी नवे शेअर्स जारी करणार आहे. सोबतच ६४५.५६ कोटी रूपयांचे ८.४९ कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गतही आहेत. ओएफएसमध्ये भाविश अग्रवाल यांच्यासोबत सॉफ्टबँक, टेमासेक, मॅट्रिक्स पार्टनर्स इंडियादेखील आपले शेअर्स विकरणार आहे. ९ ऑगस्टला कंपनीच्या शेअर्सचं बीएसई आणि एनएसईवर लिस्टिंग होईल.
रिझर्व्ह हिस्सा
ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्ससाठी ७५ टक्के, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १० टक्के आणि नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्ससाठी १५ टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, बोफा सिक्युरिटीज इंडिया, अॅक्सिस कॅपिटल, एसबीआय कॅपिटल मार्केट्स, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया, गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि बॉब कॅपिटल मार्केट्स हे आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर लिंक इनटाइम इंडिया रजिस्ट्रार आहे.
सबस्क्राईब करावा का?
बहुतांश विश्लेषकांनी ओला इलेक्ट्रिकच्या आयपीओला 'सबस्क्राइब' रेटिंग दिलं आहे. देशांतर्गत इलेक्ट्रिक टू-व्हीलर्समध्ये मार्केट लीडर असल्यानं ओलाला या क्षेत्रातील कोणत्याही सकारात्मक घडामोडींचा फायदा होईल, असं यामागचं लॉजिक आहे. आनंद राठी यांच्या विश्लेषकांनी ओला इलेक्ट्रिक आयपीओला लाँग टर्म सबस्क्राइब रेटिंग दिलं आहे. ओला इलेक्ट्रिक हा ईव्ही क्षेत्रातील सर्वात वेगाने वाढणारा सेगमेंट आहे, असं त्यांचं मत आहे. कंपनीचे मूल्यांकन चांगलं आहे.
कुंवरजी वेल्थ सोल्युशन्सनंही कंपनीवरील कर्जाचा बोजा हळूहळू कमी होण्याची शक्यता असल्यानं लाँग टर्मसाठी इश्यू सबस्क्राइब करण्याचा सल्ला दिला आहे. हेन्सेक्स सिक्युरिटीज आणि एलकेपी सिक्युरिटीजनंदेखील दीर्घकालीन सबस्क्राइब करण्याचा सल्ला दिला आहे.
Ola Electric ची जमेची बाजू
- देशातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची बाजारपेठ सातत्याने वाढत असून ही या सेगमेंटमधील सर्वात मोठी कंपनी आहे. ही एक प्युअर इलेक्ट्रिक वाहन कंपनी देखील आहे.
- कंपनीला आपल्या क्षेत्रात चांगला अनुभव असून त्याच्याकडे उत्पादनही वैविध्यपूर्ण आहेत.
- कंपनीचे आधुनिक आणि मोठे उत्पादन प्रकल्प आहेत आणि आर अँड डी वर देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे.
कमकुवत बाजू
- कंपनी काही कच्च्या मालासाठी थर्ड पार्टीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.
- आर्थिक आकडेवारीवरून असं दिसून येतंय की कंपनी अजूनही तोट्यात आहे आणि त्यांचा कॅपिटल एक्सपेंडिचर अजूनही सुरू आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)