Ola Electric : इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या ओला कंपनीचे सध्या बुरे दिन सुरू आहेत. ओला इलेक्ट्रिक स्कूटर संदर्भात ग्राहकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. सोशल मीडियावरही यावरुन कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल संतप्त झाले होते. अशा परिस्थितीत ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपनीला आणखी एक धक्का बसला आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने (MHI) ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाला (ARAI) ओला इलेक्ट्रिक विरुद्ध ग्राहकांच्या तक्रारींबाबत तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
पहिल्यांदाही आली होती नोटीसयापूर्वी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ७ ऑक्टोबर रोजी ओला इलेक्ट्रिकला ग्राहक हक्कांचे उल्लंघन, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि चुकीचे व्यवहार पद्धतींबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली होता. फेम II आणि पीएम ई-ड्राइव्ह योजनांच्या अंतर्गत, मूळ उपकरण उत्पादकांना (OEMs) ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘सर्विस सेंटर’ स्थापन करणे आवश्यक आहे. याशिवाय या दोन योजनांतर्गत सर्व ओईएमद्वारे वॉरंटी देखील प्रदान केली जाते.
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर तक्रारींचा पाढाकंपनीने ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ च्या अनेक कलमांचे उल्लंघन केल्याचं नोटीसीमध्ये सीसीपीएने म्हटले आहे. ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कंपनीला उत्तर देण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. माहितीनुसार, ग्राहक व्यवहार विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर गेल्या वर्षभरात कंपनीविरोधात १०,६४४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये ओला स्कूटरच्या खराब सेवेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.
काय आहेत ग्राहकांच्या समस्या?मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट असलेल्या स्कूटर्सची विक्री केल्याचा आरोपही कंपनीवर आहे. बुकिंग रद्द केल्यावर रिफंड देण्यास टाळाटाळ करण्यात येते. सर्विसनंतरच्या समस्या, बॅटरी आणि पार्ट्सशी संबंधित तक्रारींचा यात समावेश आहे. विभागाच्या सचिव निधी खरे यांनी याला दुजोरा देत सीसीपीए या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले.