Ola Electric share price: मंगळवारी व्यवहारादरम्यान ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स फोकसमध्ये होते. इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक कंपनीच्या शेअरमध्ये आज ५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आणि हा शेअर ७६.६१ रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. शेअर्सच्या या घसरणीमागे एक मोठं कारण आहे. ओला इलेक्ट्रिकचा तीन महिन्यांचा म्हणजेच ९० दिवसांचा अँकर लॉक-इन पीरिअड आज संपला.
तीन महिन्यांचा अँकर लॉक-इन पीरिअड संपल्यानं अँकर गुंतवणूकदारांनी लॉक केलेले १८.१८ कोटी ओला इलेक्ट्रिकचे शेअर्स आता बाजारात ट्रेडिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. मात्र, हा लॉक-इन कालावधी संपल्यानं हे सर्व शेअर्स विकले जातील, असं नाही. हे शेअर्स केवळ ट्रेडिंगसाठी पात्र आहेत.
यापूर्वी ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सचा ३० दिवसांचा अँकर लॉक-इन पीरिअड ९ सप्टेंबर रोजी संपला होता. नियमांनुसार, आयपीओमध्ये अँकर गुंतवणूकदारांनी खरेदी केलेले शेअर्स लॉक-इन कालावधीत असतात. अँकर गुंतवणूकदारांना देण्यात आलेले एकूण ५० टक्के शेअर्स ३० दिवसांसाठी लॉक केले जातात आणि उर्वरित ५० टक्के शेअर्स ९० दिवसांसाठी लॉक केले जातात.
२ ऑगस्टला आलेला आयपीओ
ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ २ ऑगस्ट २०२४ रोजी लाँच करण्यात आला होता आणि इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनीनं बाजारातून ६,१४५.५६ कोटी रुपये उभे केले होते. इश्यू उघडण्याच्या एक दिवस आधी ओला इलेक्ट्रिकने आयपीओसाठी प्रति शेअर ७६ रुपये प्रति शेअर या अपर प्राईज बँडवर विविध देशी-विदेशी संस्थांना ३६.३५ कोटी शेअर्सचं वाटप करून अँकर गुंतवणूकदारांकडून २,७६३ कोटी रुपये उभे केले होते. ओला इलेक्ट्रिकच्या शेअरचं ९ ऑगस्ट रोजी शेअर बाजारात फ्लॅट लिस्टिंग झालं.
लिस्टिंगच्या एका आठवड्यातच कंपनीच्या शेअर्सनी दमदार परतावा दिला. ओला इलेक्ट्रिकच्या शेअरचा भाव २० ऑगस्ट रोजी १५७.५३ रुपयांवर पोहोचला होता. म्हणजे १०८ टक्के परतावा दिला. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने सोमवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत ८ नोव्हेंबर रोजी संचालक मंडळाची बैठक होणार असल्याचं म्हटलं. यामध्ये कंपनी ३० सप्टेंबर २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)