Join us

Ola Electricचे शेअर बनले रॉकेट, HSBC नं दिलं 'बाय' रेटिंग; पाहा काय आहे टार्गेट प्राईज?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 10:49 AM

Ola Electric Mobility Share Price: लिस्टिंगच्या दिवसापासूनच ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. अवघ्या पाच सत्रांमध्ये या शेअरच्या किंमतीत ६२ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये.

Ola Electric Mobility Share Price: लिस्टिंगच्या दिवसापासूनच ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडच्या शेअरमध्ये जोरदार तेजी दिसून येत आहे. अवघ्या पाच सत्रांमध्ये या शेअरच्या किंमतीत ६२ टक्क्यांहून अधिक वाढ झालीये. आजही ओलाच्या शेअरमध्ये तेजी कायम असून सुरुवातीच्या कामकाजादरम्यान त्यात १२ टक्क्यांपर्यंत वाढ झालीये. कामकाजाच्या सुरुवातीला ओलाचे शेअर्स १२३.७० रुपयांवर ट्रेड करत होते. त्यानंतर काही वेळातच कंपनीच्या शेअर्सना २० टक्क्यांचं अपर सर्किट लागून शेअर १३३.०८ रुपयांवर पोहोचला.

पहिल्या तिमाहीत तोटा

दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिकचा तोटा पहिल्या तिमाहीत वाढलाय. कंपनीला २६७ कोटींच्या तुलनेत ३४७ कोटी रुपयांचा तोटा झाला. मात्र, महसुलात ३२ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीच्या सेल डिविजनचं उत्पन्न तीन कोटींवरून पाच कोटी रुपयांवर गेलं आणि त्यांचा तोटा ४२ कोटींवरून ३७ कोटींवर आला. गेल्या आठवड्यात ९ ऑगस्ट रोजी कंपनीचा शेअर लिस्ट झाला होता.

ओला इलेक्ट्रिकवर एचएसबीसीची प्रतिक्रिया

एचएसबीसीनं बाय कॉलसह ओला इलेक्ट्रिकवर आपलं कव्हरेज सुरू केलं आहे. ब्रोकरेज कंपनीनं या शेअरसाठी १ वर्षासाठी १४० रुपयांची टार्गेट प्राईज निश्चित केली आहे. एचएसबीसीच्या म्हणण्यानुसार, भारतात ईव्हीचा प्रवेश आणि इतर अनिश्चितता असूनही, सरकारकडून सातत्यानं नियामक समर्थन मिळत असल्यामुळे ओलामध्ये गुंतवणूक करणं योग्य ठरतं. ओलाची खर्च कमी करण्याची क्षमता आणि बॅटरी व्यवसायातील पॉझिटिव्ह रिस्क रिवॉर्ड यामुळे हे गुंतवणुकीसाठी आकर्षक बनवतात. इलेक्ट्रिक दुचाकींचा संथ प्रसार आणि बॅटरी प्लांटच्या समस्या हे प्रमुख नकारात्मक घटक असल्याचंही त्यांनी म्हटलं.

अनिश्चितता असूनही, आर्थिक वर्ष २०२७-२०२८ पर्यंत ईव्हीच्या उत्पादन खर्च लक्षणीय प्रमाणात कमी होईल. तर उत्सर्जन मानकांमुळे आयसीई स्कूटरची किंमत वाढू शकते, असंही एचएसबीसीनं म्हटलंय.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :ओलाइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार