ओलाचे (Ola) सह-संस्थापक आणि सीईओ यांनी अलीकडेच ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीटमध्ये एक महत्त्वाची माहिती दिली. तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यात कंपनीचे नवीन ईव्ही उत्पादन युनिट लवकरच सुरू होणार आहे. हे युनिट पूर्ण झाल्यानंतर २५ हजार लोकांना नोकऱ्या मिळणार असल्याची माहिती भाविश अग्रवाल यांनी दिली. २ हजार एकरमध्ये पसरलेल्या या ईव्ही हबमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटीशिवाय वेंडर आणि सप्लायर नेटवर्क देखील असेल असं म्हणत भाविश अग्रवाल यांनी भारताला ईव्हीचं जागतिक केंद्र बनवण्याची इच्छाही व्यक्त केली.
१ कोटी ईव्हींचं उत्पादन
आठ महिन्यांत भारतात दुचाकी उत्पादनाची सुविधा उभारण्यात आपल्याला यश आल्याचं भाविश अग्रवाल म्हणाले. पुढील महिन्यापासून उत्पादनही सुरू होणार आहे. ही एक प्रकारची गिगा फॅक्ट्री असेल. ही संपूर्ण फॅक्ट्री पूर्ण क्षमतेने चालणार आहे. दरवर्षी १ कोटी दुचाकी येथे तयार केल्या जातील, असंही त्यांनी नमूद केलं. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, ओला इलेक्ट्रिकने तमिळनाडूमध्ये ७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. जून २०२३ मध्ये फॅक्ट्रीच्या उभारणीची घोषणा करण्यात आली होती.
विक्री वाढली
ओला इलेक्ट्रिक सध्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर श्रेणीतील मार्केट लीडर म्हणून उदयास आली आहे. नोव्हेंबरपर्यंत कंपनीचा बाजारातील हिस्सा सुमारे ३२ टक्के होता. वाहन डेटानुसार, कंपनीनं सुमारे ३० हजार वाहनांची विक्री केली आहे.