नवी दिल्ली : ओला (Ola) कंपनी आता नवीन सेवा सुरू करण्यासाठी तयार आहे. जर तुम्हाला भूक लागली असेल आणि जेवण हवं असेल तर अजिबात टेन्शन घेऊ नका. ओला 10 मिनिटांत तुम्हाला घरपोच जेवण पोहोचवणार आहे. कंपनीने या सेवेची चाचणीही सुरू केली आहे. ओलाने बंगळुरूमध्ये या नव्या सेवेची चाचणी सुरू केली आहे. खाद्यपदार्थ जलद वितरणासाठी कंपनी आपली ग्रॉसरी डिलिव्हरी सर्व्हिस ओला डॅश (Ola Dash) वापरत आहे. मात्र, सध्या या सेवेच्या मेनूमध्ये केवळ मर्यादित खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.
ओलाने आपल्या 10 मिनिटांच्या फूड डिलिव्हरी सेवेमध्ये खिचडी, पिझ्झा आणि काठी रोल यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश केला आहे. खाद्यपदार्थ पूर्णपणे ताजे असेल असा कंपनीचा दावा आहे. ओलाने काही वर्षांपूर्वी फूड डिलिव्हरी कंपनी फूडपांडा देखील विकत घेतली. याशिवाय, ओला आपल्या ओला फूड्स नावाच्या कंपनीअंतर्गत खिचडी एक्सपेरिमेंट, पराठा एक्सपेरिमेंट, बिर्याणी एक्सपेरिमेंट आणि ब्रेकफास्ट एक्स्प्रेस या नावाने किचन चालवते.
दरम्यान, फूड डिलिव्हरी कंपन्या 10 मिनिटांत अन्न पोहोचवण्याच्या सेवेवर सातत्याने भर देत आहेत. मात्र यावरून त्यांना अनेक टीकेला सामोरे जावे लागले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा झोमॅटोने (Zomato) ही सेवा सुरू करण्याबद्दल सांगितले होते, तेव्हा लोकांनी फूड डिलिव्हरी पार्टनर्सच्या सुरक्षिततेबद्दल आणि त्यांच्यावरील दबावाबद्दल चिंता व्यक्त केली होती. यावर झोमॅटोने स्पष्ट केले होते की, कंपनी ही सेवा मर्यादित क्षेत्रात सुरू करणार आहे. यासोबतच मेन्यूमध्ये अशा गोष्टींचाही समावेश केला जाईल, ज्या तयार करून लवकरात लवकर डिलिव्हर करता येतील.
याआधी Grofers ने (आता blinkit) 10 मिनिटांत ग्रॉसरी डिलिव्हरी करण्याची सेवा सुरू करण्याविषयी सांगितले होते, तेव्हाही कंपनीला अशाच टीकेला सामोरे जावे लागले होते. अलीकडेच ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Agarwal) यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून सांगितले होते की, ते आता कंपनीच्या दैनंदिन कामापासून थोडे लांब राहतील. त्याऐवजी ते नवीन विभाग आणि व्यवसायांवर लक्ष केंद्रित करतील.