नवी दिल्ली :
पेट्रोल-डिझेल आणि सीएनजीचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने आता ॲप बेस्ड कॅब कंपन्यांनी भाडेदरात वाढ केली आहे. ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांनी भाडेदरात १२ ते १६ टक्क्यांपर्यंत वाढ केली असून, कॅबने प्रवास करणे महागले आहे.
उबरने मुंबई आणि दिल्ली-एनसीआर, कोलकाता, हैदराबादमध्ये भाडेदरवाढ केली आहे. उबरसह ओलानेही अनेक शहरांत भाडेदरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उबरकडून दिल्ली-एनसीआर आणि कोलकातामध्ये १२ टक्के तर मुंबई आणि हैदराबादमध्ये १५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.
ओलाच्या मिनी आणि प्राइम कॅटेगरीसाठी १६ टक्के भाडेदरवाढ करण्यात आली आहे. उबरने दिलेल्या माहितीनुसार, इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे मोठी समस्या निर्माण होत आहे. हे पाहता कंपनीला दरवाढ करावी लागली आहे. चालक दरवाढीवर असमाधानी उबरने आपल्या भाडेदरात वाढ केली असली, तरी या वाढीनंतर कॅब ड्रायव्हर्स समाधानी नाहीत. त्यामुळे चालकांनी आणखी किमती वाढवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे इंधन दर असाच सतत वाढत राहिला तर दर आणखी वाढू शकतात असा अंदाज आहे. मागील सहा महिन्यात सीएनजी ५० टक्के महाग झाला आहे.