नवी दिल्ली : शहरात प्रवास करण्यासाठी कॅब सर्व्हिस वापरणाऱ्या लोकांसाठी एक खुशखबर आहे. कारण, आता तुम्हाला राईडसाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत. दरम्यान, ओलाने आपली ई-बाईक सर्व्हिस सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बंगळुरूमध्ये ई-बाईक सर्व्हिस यशस्वी झाल्यानंतर आता दिल्ली आणि हैदराबादमध्येही ही सर्व्हिस सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
ओलाने दिल्ली आणि हैदराबादमध्ये आपल्या 'राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म' अंतर्गत ई-बाईक सर्व्हिसचे अनावरण केले. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास ई-बाईक सर्व्हिसचा विस्तार करण्यात येईल, असे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, या ओला ई-बाईक सर्व्हिसची सर्वात खास गोष्ट म्हणजे यासाठी सर्वात कमी भाडे लागते. पेट्रोल बाईकने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ई-बाईक अधिक किफायतशीर ठरेल. या सर्व्हिसमुळे त्यांचे खूप पैसे वाचतील.
प्रवास होईल स्वस्त दिल्ली आणि हैदराबादमध्ये ओला ई-बाईक सर्व्हिसचे भाडे खूपच कमी ठेवण्यात आले आहे. पहिल्या 5 किलोमीटरसाठी 25 रुपये, 10 किमीसाठी 50 रुपये आणि 15 किमीसाठी 75 रुपये आहेत. हे भाडे कॅलक्युलेट केले तर ते प्रतिकिलोमीटर पाच रुपये होईल. ओलाने सांगितले की, ई-बाईक सर्व्हिस ही शहरांमधील वाहतुकीसाठी सर्वात किफायतशीर, टिकाऊ आणि सोयीची सेवा असणार आहे.
दरम्यान, पुढील दोन महिन्यांत दिल्ली आणि हैदराबादमध्ये 10,000 ई-बाईक तैनात करण्याची कंपनीची योजना आहे. ओला मोबिलिटीचे सीईओ हेमंत बक्षी म्हणाले की, "ओलाच्या या सर्व्हिस इलेक्ट्रिक वाहनांद्वारे 1 अब्ज भारतीयांना सेवा देण्याच्या आमच्या संकल्पनेशी सुसंगत आहे."