Join us

जुन्या नोटा बाळगल्यास शिक्षा

By admin | Published: March 02, 2017 3:55 AM

पाचशे आणि हजारांच्या १0 पेक्षा जास्त नोटा बाळगणे शिक्षापात्र गुन्हा ठरविणाऱ्या कायद्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली

नवी दिल्ली : बंद करण्यात आलेल्या पाचशे आणि हजारांच्या १0 पेक्षा जास्त नोटा बाळगणे शिक्षापात्र गुन्हा ठरविणाऱ्या कायद्याची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. या गुन्ह्यात किमान १0 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. विवक्षित बँक नोटा (देयता समाप्ती) कायदा २0१७ असे या कायद्याचे नाव आहे. गेल्या महिन्यात संसदेने त्याला मंजुरी दिली होती. या कायद्याने पाचशे आणि हजारांच्या जुन्या नोटा बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कायद्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २७ फेब्रुवारी रोजी स्वाक्षरी केली होती. ९ नोव्हेंबर ते ३0 डिसेंबर या काळात विदेशात असलेल्या नागरिकांना आपल्याकडील नोटा बँकांत जमा करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत आहे. तथापि, खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्यास ५0 हजारांचा दंड लागणार आहे. या कायद्यानुसार, १0 पेक्षा जास्त नोटा बाळगणे गुन्हा आहे. अभ्यासक आणि नाणे-नोटा जमविण्याचा छंद असणारे लोक जास्तीत जास्त २५ नोटा बाळगू शकतात. या नियमाचा भंग करणाऱ्यास १0 हजार रुपये अथवा सापडलेल्या नोटांच्या पाचपट यापैकी जी रक्कम जास्त असेल, तेवढ्या रकमेचा दंड होऊ शकेल.या कायद्याने जुन्या नोटांच्या बाबतीत रिझर्व्ह बँकेचे उत्तरदायित्व संपविले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)>न्यायदंडाधिकाऱ्यास अधिकाररिझर्व्ह बँकेने केलेल्या शिफारशीनुसार अर्थव्यवस्थेतील बहिशेबी पैसा, तसेच बनावट नोटा संपविण्यासाठी केंद्र सरकारने या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या कायद्यानुसार, ३१ डिसेंबर २0१६ नंतर या नोटा बाळगणे, हस्तांतरित करणे अथवा स्वीकारणे गुन्हा ठरविण्यात आला आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यास दंड ठोठावण्याचे अधिकार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांस आहेत.