Join us

ओमायक्रॉनचं संकट शेअर बाजारावर कोसळलं; गुंतवणूकदार झाले ४.२९ लाख कोटींनी कंगाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2021 7:53 AM

कोरोना विषाणूच्या भीतीने शेअर बाजार तीन महिन्यांच्या तळाला

मुंबई : देशामध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूचे रुग्ण वाढत चालल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे सेन्सेक्स ९५० अंशांनी खाली आला. बाजारात सर्वदूर विक्रीचा प्रभाव दिसून आला. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांची ४.२९ लाख कोटी रुपयांची मालमत्ता घटली आहे. 

शुक्रवारच्या घसरणीनंतर नवीन सप्ताहाचा प्रारंभ काहीसा वाढीने झाला. त्यानंतर  मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने ५७,७८१.४६ अंशांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मात्र बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विक्री सुरू झाली. परकीय वित्तसंस्थांनीही विक्रीला प्रारंभ केल्याने हा निर्देशांक ५६,६८७.६२ अंशांपर्यंत खाली गेला. बाजाराच्या अखेरच्या सत्रामध्ये त्यात थोडीशी वाढ होऊन अखेरीस तो ५६,७४७.१४ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये ९४९.३२ अंशांची घट झाली. संवेदनशील निर्देशांकामधील सर्वच ३० कंपन्यांच्या समभागांच्या दरामध्ये घसरण नोंदविली गेली. गेल्या तीन महिन्यातील सर्वात तळ निर्देशांकाने गाठला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही मोठी घसरण बघावयास मिळाली. 

राष्ट्रीय शेअर बाजारामध्येही अशीच परिस्थिती दिसून आली. दिवसअखेर येथील निर्देशांक (निफ्टी) २४८.४५ अंशांनी खाली येऊन १६,९१२.२५ अंशांवर बंद झाला. देशामध्ये कोरोनाच्या नवीन विषाणूने बाधित झालेले २१ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. त्यामुळे देशामध्ये पुन्हा निर्बंध लागू होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे जगभरातील शेअर बाजारांमध्येही घट होत असल्यामुळे त्याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला. बाजारामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजार भांडवलमूल्य २,५६,७२,७७१.६७ कोटी रुपयांवर आले आहे. एका दिवसामध्ये ते ४.२९ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. हे मूल्य हे कागदोपत्रीच कमी होत असले तरी त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो. 

येत्या बुधवारी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाची घोषणा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवरही गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली असतानाच, नवीन विषाणूचे संकट पुढे येत असल्यामुळे बाजारात विक्रीसाठी गर्दी झालेली दिसून येत आहे. बँक सध्याचेच दर कायम राखू शकते.

टॅग्स :शेअर बाजारओमायक्रॉन