मुंबई : आठवड्याच्या सुरुवातीस १२०० अंशांनी काेसळल्यानंतर शेअर बाजारांमध्ये तिसऱ्या दिवशी तेजी कायम हाेती. जागतिक बाजारांमधील सकारात्मक वातावरणाचा भारतीय शेअर बाजारांमध्ये चांगला परिणाम दिसून आला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३८४.७२ अंशांनी वधारून ५७,३१५.२८ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीदेखील ११७.१५ अंशांनी वधारून १७,०७२.६० अंशांवर बंद झाला. शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी राहिल्याने गुंतवणुकदार मालामाल झाले आहे. तीन दिवसांमध्ये गुंतवणुकदारांचे मालमत्तेत तब्बल ८.५८ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
रुपयाच्या तेजीचाही सकारात्मक परिणाम शेअर बाजारांवर दिसून आला. तसेच ‘ओमायक्राॅन’मुळे गंभीर आजार हाेत नसल्याचे आढळून येत असल्याने गुंतवणूकदारांच्या मनातील भीतीही काहीशी कमी झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेतील आर्थिक विकासाचे आकडेही चांगले आहेत. त्यामुळे खरेदीचा वाढलेला कल बाजारात दिसून आला. माहिती तंत्रज्ञान, वित्तीय क्षेत्र आणि वीज कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. बँका आणि स्टील कंपन्यांच्या शेअर्समध्ये काही प्रमाणात घसरण दिसून आली.