- प्रसाद गो. जोशी
ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे गडबडलेल्या बाजाराला आता तो तितका घातक नसल्याचे तज्ज्ञांचे मत पटले असून गतसप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये या विषाणूची भीती कमी झाली आहे. त्यामुळे जगभरातील बाजारांसह भारतीय शेअर बाजारही वाढला. मात्र मिडकॅप आणि स्मॉलकॅप या निर्देशांकांमध्ये मात्र घट नोंदविली गेली आहे.
अमेरिकेमधील बेरोजगारी तसेच चलनवाढीमध्ये झालेली घट आणि काही प्रमाणात कमी होत असलेल्या खनिज तेलाच्या किमती यामुळे बाजारात उत्साह निर्माण झाला आणि सप्ताहाच्या अखेरीस बाजार वाढला. भारताने मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाचा साठा करणे सुरू केल्याने आगामी काळात औद्योगिक उत्पादन वाढण्याचे संकेतही मिळाले आहेत.
ओमायक्रॉनचे रुग्ण, जगभरातील शेअर बाजारांचे वातावरण तसेच अमेरिकेची सुधारलेली आर्थिक स्थिती, खनिज तेलाचे दर यावरच बाजाराची दिशा ठरू शकेल. परकीय वित्तसंस्थाकडून कोणती भुमिका घेतली जाते. ते महत्वाचे ठरू शकते.
४१ हजार ५०० कोटींनी वाढली संपत्ती
संपलेल्या सप्ताहामध्ये प्रमुख निर्देशांकांमध्ये किरकोळ वाढ झाली असल्याने गुंतवणूकदारांच्या संपत्तीमध्ये थोडीच वाढ झाली आहे. या सप्ताहाअखेर बाजाराचे एकूण भांडवलमूल्य २,५९,७८,८१६.९७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील सप्ताहाच्या मूल्यापेक्षा त्यामध्ये ४१,५३९.३१ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
- आगामी सप्ताहात डेरिव्हेटीव्हज व्यवहारांची सौदापूर्ती असल्याने बाजार काहीसा अस्थिर राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजार वरखाली होईल.
गतसप्ताहातील स्थिती
निर्देशांक बंद मूल्य फरक
सेन्सेक्स ५७,१२४.३१ ११२.५७
निफ्टी १७,००३.७५ १८.५५
मिडकॅप २४,३५७.२७ (-) १८४.८८
स्मॉलकॅप २८,३६६.५५ (-) ८८.६५