Join us  

एकीकडे २७५ कोटींची सोने खरेदी; गरिबांचा गुढीपाडवा फक्त शोभायात्रा पाहण्यातच गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 11:10 AM

दुसरीकडे ना ताटामध्ये पुरणपोळी

मुंबई : गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबई शहर आणि उपनगरात सराफा दुकानांत सोने-चांदीची खरेदी-विक्री होत असतानाच दुसरीकडे गरिबांचा पाडवा मात्र शोभायात्रा बघण्यातच गेला. पुरणपोळी, श्रीखंडसारखे गोडधोड पदार्थ ताटात तर नाहीच, शिवाय पोराबाळांसाठी नव्या कपड्यालत्त्याची खरेदीही नाही. अशा काहीशा विवंचनेतच रस्त्याच्या कडेला, फुटपाथवर राहणाऱ्या गरिबांचा पाडवा साजरा झाल्याचे चित्र होते.

गुढीही नाही आणि पोळीही नाही

मुंबई शहर आणि उपनगरातल्या फुटपाथवर राहणाऱ्या गरिबांची संख्या लाखोंनी आहे. लालबहादूर शास्त्री मार्गासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, कुर्ला-अंधेरी रोड, एस. व्ही. रोडलगतच्या फुटपाथवर राहणाऱ्या श्रमिकांच्या झोपड्यांवर पाडव्याच्या दिवशी गुढीही नव्हती आणि ताटात पोळीही नव्हती.

काम म्हणजेच पाडवा? 

पाडव्याला निघालेल्या शोभायात्रांमध्ये सहभागी होण्याएवढा वेळदेखील श्रमिकांना नव्हता. कारण, एक दिवस जरी रोजंदारीवर नाही गेले तर दिवसभरात आबाळ होत असल्याने काम शोधण्यालाच त्यांनी प्राधान्य दिले होते.

४०० कोटींचा अंदाज चुकला

गुढीपाडव्याला मुंबईत तब्बल ४०० कोटी सोन्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होतील, असा अंदाज सराफा बाजाराने व्यक्त केला होता. मात्र, सराफा बाजाराचा हा अंदाज चुकला.

२७५ कोटी

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सोन्याची जी खरेदी-विक्री झाली; या व्यवहाराची मुंबईतील उलाढाल २७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचे सराफ बाजारातून सांगण्यात आले.

सोन्यात लाँग टर्म तेजी

बाजार अस्थिर नाही. मात्र, ग्राहक सोने घेतानाही विचार करत आहेत. कारण, सोन्याचा भाव प्रतितोळा ६० हजार रुपये आहे. आता सोन्याची खरेदी तुलनेने कमी झाली असली, तरीदेखील सोन्यात लाँग टर्म तेजी आहे. त्यामुळे बाजारपेठेने निराश होण्याचे कारण नाही. बाजार असल्याने तेजी आणि मंदी सुरूच असते. - कुमार जैन, अध्यक्ष,मुंबई ज्वेलर्स असोसिएशन.

भाव खाली-वर

  • कच्च्या तेलाच्या दराप्रमाणे सोन्याचे भावही खाली-वर होत आहेत. 
  • गेल्या दोन-एक वर्षांत सोन्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर थंडावले आहेत. 
  • मात्र, आता बाजारपेठा पुन्हा सावरू लागल्या आहेत.
टॅग्स :सोनंचांदीव्यवसाय