Raksha Bandhan Festival : राखीपौर्णिमा/रक्षाबंधनाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा राखीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे देशातील व्यापाऱ्यांचा आनंदही द्विगुणित झाला. विशेष म्हणजे, अनेक वर्षांप्रमाणे यंदाही ना चीनमधून राख्या खरेदी केल्या गेल्या, ना राखी बनवण्याच्या वस्तू आयात केल्या गेल्या. देशभरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात 'मेड इन इंडिया' राख्या खरेदी केल्या.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) च्या म्हणण्यानुसार, राख्या खरेदीसाठी देशभरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाली, त्यामुळे मागील वर्षांचे राखी विक्रीचे सर्व विक्रम मोडीत निघाले. यंदा राख्यांचा व्यवसायाने सूमारे रु. 12 हजार कोटींचा टप्पा पार केला.
सोन्याच्या विक्रीतही कमालीची वाढ
रक्षाबंधनाच्या दिवशी कोट्यवधी रुपयांच्या सोन्याची विक्री झाली. सोन्या-चांदीवरील आयात शुल्कात कपात केल्यामुळे रक्षाबंधन सणाच्या दिवशी सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी दिसली. सोमवारी सोन्याचा दर 72500 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 84 हजार रुपये किलोवर होती. सराफा व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भाव खाली आल्यापासून महिला खरेदीदारांची गर्दी दिसून आली. हे पाहता अनेक सराफा व्यापाऱ्यांनी ग्राहकांना त्यांच्या खरेदीनुसार भेटवस्तूही दिल्या. चांदीच्या राख्यांचीही सर्वाधिक विक्री झाली आहे.