Join us

देशात पुन्हा एकदा नोकऱ्यांची संख्या वाढू लागली, जाणून घ्या कोणकोणत्या फिल्डमध्ये आहेत संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 12:04 PM

कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर देशांतर्गत अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे आणि याचा फायदा नोकरीच्या संधीतही दिसून येत आहे.

कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर देशांतर्गत अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली आहे आणि याचा फायदा नोकरीच्या संधीतही दिसून येत आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. केंद्रीय श्रम मंत्रालयानं दिलेल्या अहवालानुसार उत्पादन, आरोग्य यासह नऊ क्षेत्रांमध्ये एकूण रोजगार संधी या वर्षी जानेवारी-मार्चमध्ये १० लाखांनी वाढून ३.१८ कोटींवर पोहोचल्या आहेत. त्याचवेळी खाजगी क्षेत्राच्या अहवालानुसार देशात चालू आर्थिक वर्षात जून-ऑगस्ट दरम्यान प्रवास आणि पर्यटन उद्योगात २८ टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

सरकारी आकडे काय सांगतात?कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी रोजगार सर्वेक्षण (AQEES) अंतर्गत त्रैमासिक रोजगार सर्वेक्षणाच्या चौथ्या फेरीचा (जानेवारी-मार्च 2022) अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये उत्पादन, बांधकाम, व्यवसाय, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण आणि रेस्टॉरंट्स, माहिती तंत्रज्ञान/बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) आणि आर्थिक सेवा यांचा समावेश आहे. 

गेल्या वर्षी जानेवारी-मार्चमध्ये या नऊ सेक्टरमध्ये एकूण ३.०८ कोटी लोक काम करत होते. सर्वेक्षणानुसार, या नऊ क्षेत्रांमध्ये १ जानेवारी २०२१ रोजी एकूण ३.०८ कोटी आणि १ जानेवारी २०२२ रोजी ३.१८ कोटी रोजगार होते. अशाप्रकारे, या नऊ क्षेत्रांमधील रोजगार या कालावधीत १० लाखांनी वाढला आहे. एप्रिल २०२१ मध्ये दुसऱ्या कोविड लाटेच्या पार्श्वभूमीवर लादलेले निर्बंध उठवल्यानंतर रोजगारातील वाढ आर्थिक कामांमध्ये पुनरुज्जीवन दाखवून देते. मंत्री म्हणाले की या क्षेत्रांमधील रोजगार वाढीचा कल अर्थव्यवस्थेत दिसत आहे. अहवालानुसार, कामगारांची सर्वाधिक संख्या म्हणजे एकूण कर्मचार्‍यांपैकी ३८.५ टक्के उत्पादन क्षेत्रात काम करत आहेत. त्यापाठोपाठ शैक्षणिक क्षेत्रात २१.७ टक्के, आयटी/बीपीओ क्षेत्रात १२ टक्के आणि आरोग्य क्षेत्रात १०.६ टक्के आहे. एकूण कामगारांमध्ये या चार क्षेत्रांचा वाटा सुमारे ८३ टक्के आहे. कामगारांच्या संख्येनुसार आस्थापनांवर नजर टाकल्यास ८० टक्के आस्थापनांमध्ये १० ते ९९ कामगार काम करत असल्याचा अंदाज आहे.

हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात संधीदेशात चालू आर्थिक वर्षात जून-ऑगस्ट या कालावधीत प्रवास आणि पर्यटन उद्योगातील नोकऱ्यांमध्ये २८ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. Hireact च्या जॉब इंडेक्स अहवालानुसार, प्रवास आणि पर्यटन क्षेत्रात कोविड-19 महामारीच्या काळात टाळेबंदी आणि वेतन कपात झाली. Hireact चा हा अहवाल त्याच्या प्लॅटफॉर्मवरील विविध उद्योग आणि शहरांमधील नोकरीची माहिती किंवा माहितीच्या डेटावर आधारित आहे. अहवालातील माहितीनुसार एप्रिल-ऑगस्टमध्ये जाहिराती किंवा नोकऱ्यांच्या माहितीत २८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात मासिक आधारावर आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोविड-१९ महामारीचा प्रभाव कमी झाल्यानंतर उद्योग हळूहळू रुळावर येत आहेत. हे सध्याच्या भरतीबाबत सकारात्मक स्थिती दर्शवतं. जून-ऑगस्ट दरम्यान नोंदणीकृत नवीन नोकऱ्यांमध्ये १६ टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :नोकरी