जगावर २०२२ पासून मंदीचं सावट आहे. त्याचा परिणाम मोठ्या कंपन्यांमध्ये सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या स्वरूपात दिसून येतो. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कंपन्या हजारो लोकांना कामावरून काढून टाकत आहेत. या यादीत जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन गुगल (Google) ते फेसबुकची मूळ कंपनी मेटा (Facebook Meta)आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करणाऱ्या कंपन्यांच्या या यादीत आता नोकियाचंही (Nokia) नवे नाव जोडलं जाणार आहे. कंपनीनं आपल्या १४ हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची तयारी केली आहे.
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, फिनिश टेलिकॉम गियर ग्रुप नोकियानं (NOKIA.HE) गुरुवारी सांगितलं की उत्तर अमेरिका सारख्या बाजारपेठांमध्ये 5G उपकरणांच्या मंद विक्रीमुळे तिसऱ्या तिमाहीत विक्रीत मोठी घट झाली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, विक्रीत २० टक्क्यांनी घट झाली आहे आणि या घसरणीनंतर नव्या कॉस्ट सेव्हिंग प्लॅनअंतर्गत १४ हजार नोकऱ्या कमी केल्या जातील. नोकियाच्या ले-ऑफच्या या निर्णयामुळे, कंपनीच्या सध्याच्या सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांची संख्या ७२ हजारांपर्यंत कमी होईल.
कंपनीसमोर अनेक आव्हानं
उत्तर अमेरिकेसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत कंपनीसमोर अनेक आव्हानं असताना नोकियाने कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कर्मचारी कपातीचा हा मोठा निर्णय घेतला आहे. टाळेबंदी आणि इतर खर्च-बचत उपायांद्वारे, कंपनीनं २०२६ पर्यंत ८०० मिलियन युरो (८४२ मिलियन डॉलर्स) आणि १.२ बिलियन युरोच्या दरम्यानची बचत साध्य करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
तिसऱ्या तिमाहित विक्री कमी
कंपनीनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ही कर्मचारी कपातीची प्रक्रिया वेगानं राबविली जाण्याची अपेक्षा आहे, वर्ष २०२४ साठी किमान ४०० मिलियन युरो आणि वर्ष २०२५ मध्ये अतिरिक्त ३०० मिलियन युरोंची बचत होईल. नोकिया व्यवस्थापनानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत निव्वळ विक्रीत मोठी घट झाली आहे. या कालावधीत ती ६.२४ बिलियन युरोवरून ४.९८ बिलियन युरोवर घसरली. दरम्यान एलएसईजी सर्वेक्षणानुसार हे ५.६७ बिलियन युरोच्या अंदाजापेक्षा कमी आहे.
का घेतला निर्णय?
नोकियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेक्का लुंडमार्क (Pekka Lundmark) यांनी तिसऱ्या तिमाहिदरम्यान आलेल्या आव्हानांना स्वीकारलं आणि चौथ्या तिमाहिदरम्यान नेटवर्क व्यवसायात अधिक सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली. कंपनीमध्ये १४ हजार कर्मचाऱ्यांच्या कपातीबद्दल त्यांनी माहिती दिली. बाजारात असलेली अनिश्चितता (Market Uncertainty) समायोजित करणं आणि दीर्घकालिन नफा सुरक्षित करण्यासाठी कर्मचारी कपातीचं हे पाऊल उचलणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.