Lokmat Money > बिझनेस न्यूज > एकेकाळी ऑफिसबॉय म्हणून केली नोकरी, आज बीडच्या दादासाहेब भगत यांच्या आहेत दोन कंपन्या

एकेकाळी ऑफिसबॉय म्हणून केली नोकरी, आज बीडच्या दादासाहेब भगत यांच्या आहेत दोन कंपन्या

त्यांनी आपल्या मित्रांनाही शिक्षित करून आपल्या कंपनीमध्ये नोकरी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 09:13 AM2023-08-19T09:13:15+5:302023-08-19T09:13:39+5:30

त्यांनी आपल्या मित्रांनाही शिक्षित करून आपल्या कंपनीमध्ये नोकरी दिली.

once worked with infosys as office boy today Dadasaheb Bhagat of Beed owns two companies success story | एकेकाळी ऑफिसबॉय म्हणून केली नोकरी, आज बीडच्या दादासाहेब भगत यांच्या आहेत दोन कंपन्या

एकेकाळी ऑफिसबॉय म्हणून केली नोकरी, आज बीडच्या दादासाहेब भगत यांच्या आहेत दोन कंपन्या

मनात इच्छा आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर यश हे नक्कीच मिळतं. परिस्थिती कशीही असो तुम्ही निश्चय केला आणि मेहनत घेतली तर यशाचं शिखर गाठणं कठीण राहत नाही. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर असंच यश मिळवलंय बीडच्या दादासाहेब भगत यांनी. एकेकाळी इन्फोसिसच्या ऑफिसमध्ये ऑफिसबॉय म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी मनात जिद्द ठेवली आणि आपली स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेनं कामही सुरू ठेवलं. आज त्यांच्या स्वत:च्या दोन कंपन्या आहेत. इतकंच काय तर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील दादासाहेब भगत यांचं कौतुक केलंय.

दादासाहेब भगत यांचा जन्म १९९४ मध्ये बीडमध्ये झाला. दादासाहेब भगत यांनी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातून आयटीआयचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यावेळी त्यांना नोकरीची नितांत गरज होती, म्हणून ते इन्फोसिसच्या गेस्ट हाऊसमध्ये रुम सर्व्हिस बॉय म्हणून रुजू झाले. इन्फोसिसच्या गेस्ट हाऊसमध्ये रुम सर्व्हिस, लोकांना चहा-पाणी देणं हे त्यांचं काम होतं. या कामासाठी त्यांना महिन्याला नऊ हजार रुपये पगार मिळत होता. ही नोकरी आपल्यासाठी नाही याची त्यांना कल्पना होती. इन्फोसिसमध्ये काम करताना त्यांना सॉफ्टवेअरचं महत्त्व कळलं. यानंतर त्यांनी ते शिकायचं ठरवलं.

दिवसा नोकरी रात्री शिक्षण
दादासाहेब भगत दिवसा काम करायचे, रात्री ग्राफिक्स डिझायनिंग आणि अॅनिमेशनचा अभ्यास करायचे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना मुंबईत नोकरी मिळाली. तिथे काम केल्यानंतर ते हैदराबादला गेले आणि त्यांनी तिकडे नोकरीबरोबरच C++ आणि Python चा कोर्स केला. नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा आणि शिकण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असायचा.

उभी केली कंपनी
डिझाईन आणि ग्राफिक्स कंपनीसोबत काम करताना, पुन्हा वापरता येण्याजोग्या डिझाइन आणि टेम्पलेट्सच्या लायब्ररीवर काम करणं हा एक उत्तम पर्याय असल्याचं त्यांना समजलं. इथूनच त्यांचं स्टार्टअप सुरू झालं. त्यांनी डिझाइन टेम्प्लेट्सची ऑनलाइन विक्री सुरू केली. त्यांनी नुकताच आपला व्यवसाय सुरू केला आणि त्यांच्यासोबत एक घटना घडली. एका अपघातामुळे त्यांना अनेक महिने अंथरुणाला खिळून राहावं लागलं. यादरम्यान त्यांनी आपल्या स्टार्टअपची संपूर्ण दिशा ठरवली. २०१५ मध्ये त्यांनी त्यांची पहिली कंपनी Ninthmotion सुरू केली. अवघ्या काही वेळातच त्यांच्यासोबत ६,००० ग्राहक जोडले गेले.

पंतप्रधानांकडूनही कौतुक
दादासाहेब इथेच थांबले नाहीत, त्यांनी ऑनलाइन ग्राफिक्स डिझायनिंगचं काम सुरू ठेवलं. त्यांनी ग्राफिक्स डिझाईनसाठी नवीन सॉफ्टवेअर तयार केलं, जे कॅनव्हासारखं आहे. खरंतर लॉकडाऊनच्या काळात त्यांना गावी जावं लागलं. गावातील गोठ्यात त्यांनी आपले तात्पुरतं ऑफिस सुरू केलं. शेतातील मित्रांना अॅनिमेशन आणि डिझाईनचे काम शिकवलं आणि नंतर त्यांना त्यांच्या कंपनीत नोकरी दिली. २०२० मध्ये, त्यांनी सोपं डिझाइनिंग सॉफ्टवेअर तयार केलं आणि त्यांची दुसरी कंपनी DooGraphics सुरू केली. एकेकाळी नऊ हजार रुपयांची नोकरी करणारे दादासाहेब आज लाखोंची कमाई करत आहेत. २६ सप्टेंबर २०२० रोजी पंतप्रधान मोदींनी त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात दादासाहेबांच्या कार्याची प्रशंसा केली.

Web Title: once worked with infosys as office boy today Dadasaheb Bhagat of Beed owns two companies success story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.