नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. यादरम्यान ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सने (ONDC) एका आठवड्यात ७० रुपये प्रति किलो दराने १०,००० किलो टोमॅटो विकले आहेत. ओएनडीसी ही सरकार समर्थित ई-कॉमर्स कंपनी आहे. कंपनीच्या स्थापनेनंतर कंपनीला सर्वाधिक ११ लाख रिटेल ऑर्डर मिळाल्या आहेत, असे कंपनीचे प्रमुख टी. कोशी यांनी सांगितले.
ओएनडीसीची स्थापना गेल्या वर्षी झाली होती. ओएनडीसीने इतके टोमॅटो फक्त दिल्लीत विकले आहेत. दरम्यान, टोमॅटोचे किरकोळ दर चढे असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला. टोमॅटोचे दर १५० ते २०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. अशा परिस्थितीत केंद्राने नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन (NCCF) आणि नाफेडला टोमॅटो स्वस्तात विकण्याचे निर्देश दिले होते.
एनसीसीएफमधूनच ओएनडीसीला टोमॅटोचा पुरवठा केला जात होता. एनसीसीएफ आणि नाफेड आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंडईतून खरेदी करून दिल्ली-एनसीआर, बिहार, राजस्थान आदी राज्यांना पुरवठा करत होते. टी. कोशी म्हणाले की, कंपनीला एनसीसीएफकडून गेल्या आठवड्यात दररोज २००० किलो टोमॅटोचे वाटप करण्यात आले होते. हे टोमॅटो दुपारपर्यंत संपत आहेत. ओएनडीसीवरील दैनंदिन ऑर्डर्सची संख्या सातत्याने वाढत असल्याची माहितीही त्यांनी दिली.
१५ दिवसांत ५६० टन टोमॅटोची विक्री
सहकारी संस्था एनसीसीएफने रविवारी सांगितले की, गेल्या १५ दिवसांत दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये ५६० टन (५,६०,०००) टोमॅटो अनुदानित दराने विकले गेले आहेत. प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव अद्याप खाली आलेले नाहीत. यामुळे एनसीसीएफने अनुदानित दराने टोमॅटोची विक्री सुरू ठेवली आहे. एनसीसीएफने १४ जुलै रोजी ९० रुपये प्रति किलो अनुदानित दराने टोमॅटोची विक्री सुरू केली, जी नंतर ७० रुपये प्रति किलोपर्यंत कमी करण्यात आली.
नाफेडमार्फत बिहारमध्ये टोमॅटोची विक्री
एनसीसीएफ ग्राहकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने अनुदानित दराने टोमॅटोची विक्री करत आहे. दुसरीकडे नाफेड बिहार आणि इतर राज्यांमध्ये अनुदानित दराने टोमॅटोची विक्री करत आहे. एनसीसीएफचे व्यवस्थापकीय संचालक अनीस जोसेफ चंद्रा म्हणाले, "आम्ही २८ जुलैपर्यंत दिल्ली, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये सुमारे ५६० टन टोमॅटो विकले आहेत. तिन्ही राज्यात विक्री सुरू आहे. एनसीसीएफ दिल्लीत मोबाइल व्हॅन, केंद्रीय भंडारच्या निवडक आउटलेट्स आणि डिजिटल कॉमर्ससाठी सरकार-समर्थित ओपन नेटवर्क (ओएनजीसी) द्वारे टोमॅटोची विक्री करत आहे.