नवी दिल्ली : पैशांच्या टंचाईला तोंड देणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अर्थ मंत्रालय प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत एक महिन्याची योजना राबविली जाणार आहे. या मोहिमेद्वारे एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे वितरण केले जाईल, अशी अर्थ मंत्रालयाला आशा आहे.
अर्थ सेवा सचिव हसमुख अधिया यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, ‘‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्रातील बँका, क्षेत्रीय ग्रामीण विकास बँका आणि विदेशी बँकांसाठी लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्जाचे वितरण एक लाख कोटी रुपये होईल.’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या एप्रिलमध्ये या योजनेचे उद््घाटन केले. त्यानंतर या योजनेअंतर्गत आतापर्यंत २० लाख लोकांना १४ हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्यात आम्ही अभियान राबविणार आहोत. आम्ही या महिन्यातच २०-२५ लाख नवे कर्ज उपलब्ध करून देऊ अशी आम्हाला खात्री आहे.
प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत छोट्या उद्योजकांना ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. भाजी विक्रेते, वाहनचालक, वाहने दुरुस्ती करणारे, फिटर, इलेक्ट्रिशियन आदींना ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते.
या कर्जाच्या व्याजाचा दर १२ टक्के असून हे कर्ज उपलब्ध करून देण्याची पद्धतही खूप सोपी करण्यात आली आहे. छोट्या उद्योजकांसाठी दरमहा १ टक्का दराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. कर्जाचा काही भाग मुद्रा क्रेडिट कार्डच्या रूपाने खेळते भांडवल म्हणून दिले जाईल व त्यावर केवळ जेवढे पैसे वापरले तेवढ्यावरच व्याज आकारले जाईल.
‘छोट्या व्यावसायिकांना देणार एक लाख कोटी रुपयांचे कर्ज’
पैशांच्या टंचाईला तोंड देणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अर्थ मंत्रालय प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत एक महिन्याची योजना राबविली
By admin | Published: August 19, 2015 10:37 PM2015-08-19T22:37:28+5:302015-08-19T22:37:28+5:30