नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ॲपल ही भारतात इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सर्वाधिक रोजगार निर्माण करणारी कंपनी ठरली आहे. मागील १९ महिन्यांत कंपनीने सरकारच्या उत्पादनाधिष्ठित प्रोत्साहन लाभ (पीएलआय) योजनेअंतर्गत १ लाख प्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, ॲपलचे व्हेंडर्स आणि सुटे भाग पुरवणाऱ्या उद्योगांनी हे रोजगार निर्माण केले आहेत. भारत सरकारने स्मार्टफोन उत्पादनासाठी निर्माण केलेल्या पीएलआय योजनेंतर्गत ही रोजगार निर्मिती झाली आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये ही योजना सुरू झाली. त्यानंतरच्या १९ महिन्यांत हे रोजगार निर्माण झाले आहेत.
- ६० टक्के रोजगार ॲपलसाठी आयफोनची जुळवणी करणाऱ्या फॉक्सकॉन होन हाई, पेगाट्रॉन आणि विस्ट्रॉन या ३ व्हेंडर्सनी दिले. विशेष म्हणजे त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी पीएलआय योजनेच्या उद्दिष्टापेक्षा अधिक ७ हजार एवढे रोजगार निर्माण केले आहेत.
- ४० हजार रोजगार ॲपलच्या पुरवठादारांसह एकूण इकोसिस्टिमने निर्माण केले. या पुरवठादारांत टाटा इलेक्ट्रॉनिक्स, सॅलकॉम्प, ॲव्हरी, फॉक्सलिंक, सनवोडा आणि जाबिल यांचा समावेश आहे.
एक अब्ज डॉलर्सची निर्यातभारतातून एकाच महिन्यात १ अब्ज डाॅलर्स किमतीचे स्मार्टफाेन्स निर्यात करणारी ॲपल ही पहिलीच कंपनी ठरली हाेती. कंपनीने डिसेंबर २०२२ मध्ये हा टप्पा गाठला हाेता. एप्रिल ते डिसेंबर २०२२ या काळात कंपनीने ३० हजार काेटी रुपयांचे आयफाेन्स निर्यात केले हाेते. भारतातून निर्यात हाेणाऱ्या एकूण स्मार्टफाेन्सपैकी हा ४० टक्के वाटा हाेता.
कंपनीचे भारताला प्राधान्य
- गेल्या काही वर्षांत चीनमध्ये ॲपलला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे तेथील उत्पादनावर प्रचंड परिणाम झाला आहे. म्हणून कंपनीने सुरळीत उत्पादनासाठी पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती.
- भारतातील वातावरण व योजना अनुरूप असल्यामुळे कंपनीने भारतात उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. त्याचा परिणाम दिसत आहे.