Join us

महिनाभरात येणार एक लाख मेट्रिक टन कांदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 4:28 AM

केंद्र सरकारने एमएमटीसीला येत्या महिन्यासाठी तातडीने १ लाख मेट्रिक टन कांद्याची आवक करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली : देशामधील कांद्याचा साठा कमी असल्याने किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडत असल्याने केंद्र सरकारने एमएमटीसीला येत्या महिन्यासाठी तातडीने १ लाख मेट्रिक टन कांद्याची आवक करण्याचे आदेश दिले आहेत. इजिप्त, तसेच तुर्कस्तानमधून हा कांदा आयात केला जाणार असून, त्याच्या देशांतर्गत वितरणाची जबाबदारी नाफेडवर सोपविण्यात आली आहे.देशातील कांद्याचा साठा कमी असतानाच दोन महिन्यांपूर्वी महाराष्टÑ, तसेच कर्नाटकात आलेल्या महापुरामुळेही कांद्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे मागणीपेक्षा पुरवठा खूपच घटला व देशांतर्गत किरकोळ बाजारामध्ये कांद्याचे दर वाढू लागले. या दरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी अखेर केंद्र सरकारने कांदा आयातीचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नागरी पुरवठा विभागाने एमएमटीसीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून येत्या महिनाभरासाठी देशांतर्गत बाजारपेठेत वितरणासाठी एक लाख मेट्रिक टन कांद्याची त्वरित आयात करण्यास सांगितले. आयात कांद्याचे देशांतर्गत बाजारपेठेमध्ये वितरण करण्याची जबाबदारी ही नाफेडवर सोपविण्यात आली आहे. इजिप्त व तुर्कस्तान या देशांमधून हा कांदा आयात केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारने या आधीच कांद्याची आवक सुरू केली असून, त्या अंतर्गत इजिप्तचा कांदा बाजारामध्ये आलेलाही आहे.देशभरातील कांद्याची उपलब्धता आणि दरांची स्थिती यावर लक्ष ठेवण्यासाठी एक आंतरमंत्रालय समिती स्थापन करण्यात आली असून, ती ठरावीक कालावधीने याबाबतचा आढावा घेईल. दर आणि उपलब्धता याचा आढावा घेऊन धोरणामध्ये काही बदल करावयाचा असल्यास त्याचे अधिकारही या समितीला देण्यात आले आहेत. दरम्यान, मागील सप्ताहामध्ये केंद्रीय कॅबिनेट सचिवांनी बोलाविलेल्या एका उच्चस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये इजिप्त आणि तुर्कस्तानला प्रतिनिधी पाठवून तेथून कांदा तातडीने आयात कसा करता येईल, ते बघण्याचा निर्णय झाला. त्याचप्रमाणे, दुबईलाही एक प्रतिनिधी पाठवून तेथून काही कांदा मिळणे शक्य होते का, याची चाचपणी करण्याचेही ठरविण्यात आले.>निम्मे पीक झाले नष्टलासलगाव (जि.नाशिक ) : भारताला लागणाºया कांद्यापैकी निम्म्याहून अधिक कांदा हा महाराष्टÑामध्ये पिकतो. राज्यातील कांदा पिकाला सप्टेंबरमध्ये आलेल्या पावसाचा व महापुराचा मोठा फटका बसला. निम्म्याहून अधिक पीक नष्ट झाले. यापैकी काही क्षेत्रावर दुबार पीक घेतले जाऊ शकत असले तरी येत्या वर्षभरामध्ये कांद्याची टंचाईच जाणविण्याची शक्यता आहे.नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर कांदा पिकतो. यंदा जिल्ह्यात ५३ हजार ६७२ हेक्टरवर कांद्याची लागवड झाली. यापैकी तब्बल १७ हजार ६५८ हेक्टर क्षेत्राला पाऊस व पुराचा फटका बसल्याचा प्राथमिक अहवाल कृषी अधीक्षक कार्यालयाने दिला. निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

टॅग्स :कांदा