नवी दिल्ली : भारतात डाळींच्या किमती नियंत्रणात आणावयाच्या असतील तर १ कोटी टन डाळींची आयात करावी लागेल, असे प्रतिपादन औद्योगिक क्षेत्रातील संघटना असोचेमने आपल्या अहवालात म्हटले आहे. डाळींच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर असोचेमने यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात म्हटले आहे की, २0१४-१५ या आर्थिक वर्षात भारताने ४४ लाख टन डाळींची आयात केली होती. यंदा पावसाळा कमजोर होता. त्याचा थेट फटका डाळींच्या उत्पादनास बसला आहे. यंदा १.७ कोटी टन डाळी उत्पादित होतील, असा अंदाज आहे. २0१४-१५ या आर्थिक वर्षात ते १.७२ कोटी टन होते. उत्पादन घटल्याबरोबरच मागणीतही मोठी वाढ झाली आहे. याचा संयुक्त परिणाम म्हणून भारताला १.0१ कोटी टन डाळी आयात कराव्या लागतील. असोचेमचे महासचिव डी. एस. रावत यांनी म्हटले की, यंदा आम्ही अत्यंत कठीण स्थितीचा सामना करीत आहोत. त्यावर उपाय काढावा लागेल.
१ कोटी टन डाळींची आयात करावी लागेल
By admin | Published: November 02, 2015 12:10 AM