Join us

देशाच्या एकूण प्राप्तिकरापैकी ११ टक्के कर एकाच व्यक्तीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2017 12:48 AM

0१४-१५ या आढावा वर्षात एकाच व्यक्तीकडे २१,८७0 कोटी रुपयांचा आयकर निघाला. ही रक्कम सर्व भारतीयांनी भरलेल्या प्राप्तिकराच्या ११ टक्के आहे.

नवी दिल्ली : २0१४-१५ या आढावा वर्षात एकाच व्यक्तीकडे २१,८७0 कोटी रुपयांचा आयकर निघाला. ही रक्कम सर्व भारतीयांनी भरलेल्या प्राप्तिकराच्या ११ टक्के आहे. प्राप्तिकर विभागाने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.तीन लोकांनी आपले व्यावसायिक उत्पन्न ५00 कोटी रुपयांपेक्षा जास्त दाखविले आहे. २0१४-१५ या आढावा वर्षात (२0१३-१४ या वर्षासाठी) दोन जणांनी दीर्घ कालीन भांडवली लाभ ५00 कोटींपेक्षा जास्त दाखविला आहे. या करदात्यांची नावे प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेली नाहीत. आॅक्सफॅम इंडिया या संस्थेने अलीकडेच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १ टक्का श्रीमंत भारतीयांकडे देशाच्या एकूण संपत्तीपैकी ५८ टक्के संपत्ती एकवटली आहे. तळाच्या ७0 टक्के लोकांकडे जेवढी संपत्ती आहे, तेवढी संपत्ती फक्त ५७ अब्जाधीशांकडे आहे.अमेरिकेत १ टक्का लोकांकडे देशाच्या उत्पन्नापैकी १९ टक्के उत्पन्न आहे. हे १ टक्का लोक अमेरिकेच्या एकूण करापैकी ३८ टक्के कर देतात. याच पातळीवर भारतातील श्रीमंत नेमके किती टक्के कर देतात याची आकडेवारी प्राप्तिकर विभागाने जाहीर केलेली नाही. अशी आकडेवारी भारत सरकारकडून प्रसिद्ध केली जात नाही. २0१0मध्ये जगाची जेवढी लोकसंख्या होती त्यातील अर्ध्या लोकसंख्येकडे असलेल्या संपत्ती एवढी संपत्ती ३८८ श्रीमंतांकडे होती. २0१५मध्ये संपत्ती अधिक एकवटली. अवघ्या ६२ लोकांकडेच अर्ध्या जगाच्या संपत्तीएवढी संपत्ती आली, असे आॅक्सफॅमच्या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)