AR Rahman Net Worth : ऑस्कर विजेते संगीतकारए. आर. रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो लग्नाच्या जवळपास तीन दशकांनंतर विभक्त होत आहेत. रहमान यांनी १९९५ मध्ये सायरा बानो यांच्याशी लग्न केलं आणि त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुलं आहेत. नात्यातील भावनिक तणावामुळे हा निर्णय घेतल्याचे सायरा यांनी सांगितलं. ए. आर. रहमान यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत संगीतकारांमध्ये केली जाते. १९९२ मध्ये रोजा या चित्रपटातून प्रसिद्धी मिळवलेल्या रहमान यांच्याकडे आज सुमारे २१०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. देश-विदेशात त्यांची अनेक आलिशान घरं असून त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत.
एआर रहमान सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे गायक आणि संगीतकार आहेत. एका अंदाजानुसार रहमान एका गाण्यासाठी तीन कोटी रुपयांपर्यंत फी घेतात. ही रक्कम इतर कोणत्याही गायकापेक्षा १२ ते १५ पट जास्त आहे. एका चित्रपटाला संगीत देण्यासाठी ते ८ ते १० कोटी रुपये घेतात. त्याचप्रमाणे त्यांच्या लाइव्ह परफॉर्मन्ससाठी ते प्रति तास ३ ते ५ कोटी रुपये घेतात.
देश-विदेशात महागडी घरं
रहमान यांच्या मुंबई, चेन्नई, लंडन आणि लॉस एंजेलिसमध्ये अनेक महागड्या मालमत्ता आहेत. त्याच्या आलिशान मालमत्तेत चेन्नईतील घराचा ही समावेश आहे. बंगल्यात आलिशान इंटिरिअर, मल्टिपल बेडरूम, प्रशस्त लेदर लाउंजर, मोठी डायनिंग स्पेस, एंटरटेनमेंट झोन आणि जॉइंट म्युझिक स्टुडिओ आहे. याशिवाय लॉस एंजेलिस, लंडन, दुबई आणि मुंबई येथेही त्यांची घरं आहेत. ए. आर. रेहमान यांचं मुंबई, लंडन आणि लॉस एंजेलिस मध्ये केएम मुसिक स्टुडिओ या नावाने स्टुडिओ आहेत. ए. आर. रेहमान यांच्याकडे अनेक महागड्या गाड्याही आहेत. यामध्ये व्होल्वो एसयूव्ही (९३.८७ लाख रुपये), जग्वार (१.०८ कोटी रुपये) आणि मर्सिडीज (२.८६ कोटी रुपये) यांचा समावेश आहे.
रोजासाठी मिळालेले २५००० रुपये
रोजा या चित्रपटाला संगीत देण्यासाठी ए. आर. रहमान यांना केवळ २५ हजार रुपये मिळाले. या चित्रपटातील गाणी प्रचंड गाजली होती आणि रहमानही रातोरात प्रसिद्ध झाले होते. यानंतर ए. आर. रहमान यांच्या संगीत आणि गाण्यांचे लोक चाहते झाले. कालांतरानं त्याची प्रसिद्धी आणि फीही वाढत गेली. ए. आर. रहमान यांना दोन ऑस्कर, सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दोन ग्रॅमी पुरस्कार, एक गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.