नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी सरकारने आज अत्यंत सोपा आणि सुटसुटीत एक पानी अर्ज करदात्यांच्या सेवेत सादर केला. तसेच शनिवारपासून आॅनलाइन प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करणे सुरू होत आहे. यंदापासून प्राप्तिकर विवरणपत्रासोबत आधार क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले असून नोटाबंदी लागू झाल्यानंतर २ लाखांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यावर जमा केली असल्यास त्याचा तपशीलही द्यावा लागणार आहे. आयटीआर-१ (सहज) हा एक पानी अर्ज सरकारने करदात्यांसाठी आणला आहे. आधीच्या सात पानी अर्जाची जागा तो घेईल. वेतन, घर आणि व्याज या माध्यमातून ५0 लाखांपर्यंत उत्पन्न मिळणारे करदाते हा अर्ज भरू शकतील. सध्या सहज (आयटीआर-१) हा अर्ज पगारदारांकडून तर आयटीआर-२ हा अर्ज व्यावसायिक उत्पन्न नसलेल्या व्यक्ती तसेच अविभक्त हिंदू कुटुंबांकडून भरला जातो. आयटीआर-२ए हा अर्ज रद्दच करण्यात आला आहे. व्यावसायिक लाभ, भांडवली लाभ नसलेले तसेच विदेशात संपत्ती नसलेले हिंदू अविभक्त परिवारातील व्यक्ती आयटीआर-२ए हा अर्ज वापरीत होत्या.‘सहज’मध्ये पॅनच्या बरोबरीने १२ अंकी आधार क्रमांक नोंदविण्याची सोय आहे. नोटाबंदीच्या काळातील २ लाखांवरील बँक जमा रकमेचा तपशीलही त्यात देता येऊ शकेल. सूत्रांनी सांगितले की, सध्या देशात २९ कोटी लोकांकडे पॅन क्रमांक आहे. मात्र त्यातील केवळ ६ कोटी पॅनकार्ड धारक प्राप्तिकर विवरणपत्र भरतात. आयटीआर-१ साठी ई-फायलिंगची सुविधा १ एप्रिलपासून सुरू होत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)आधार नोंदणीसाठीचा क्रमांक द्यावा लागेलप्राप्तिकर विवरणपत्र ३१ जुलैपर्यंत भरले जाऊ शकते. ई-रिटर्न दाखल करताना करदात्यास पॅन, आधार क्रमांक, व्यक्तिगत माहिती आणि कर भरणा तपशील भरावा लागेल. टीडीएस कापला गेला असल्यास त्याची माहिती आपोआप येईल. वित्त विधेयक-२0१७ तील सुधारित तरतुदीनुसार, १ जुलैनंतर करदात्यांना आधार क्रमांक अर्जासोबत नोंदवावाच लागेल. आधार नसल्यास आधार नोंदणीसाठी केलेल्या अर्जाचा क्रमांक द्यावा लागेल. आयटीआर-४ हा अर्ज आता सुगम या नावाने ओळखला जाईल. तसेच तो आयटीआर-४एस या अर्जाची जागा घेईल.