पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी वन९७ कम्युनिकेशन्सच्या शेअरमध्ये (One97 Communication Share Price) गुरुवारी आणखी ५ टक्क्यांची वाढ झाली. पेटीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यात झालेल्या कराराच्या चर्चेच्या वृत्ताचं बुधवारी कंपनीनं खंडन केलं. गेल्या सहा महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ५६ टक्क्यांची घसरण झाली आहे.
गुंतवणूकदारांनी पेटीएमच्या शेअर्सवर विश्वास दाखवला आणि बुधवारी ५ टक्क्यांनी वधारल्यानंतर आजही त्यात मोठी वाढ झाली आहे. हे सलग दुसरं सत्र आहे ज्यात पेटीएमच्या शेअर्सनं ५ टक्क्यांचा उच्चांकी स्तर गाठला आहे. गेल्या पाच दिवसांत त्यात १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत पेटीएमच्या शेअरची किंमत निम्म्यानं कमी झाली आहे. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ९९८.३० रुपये आणि नीचांकी स्तर ३१० रुपये आहे.
रिझर्व्ह बँकेची कारवाई
रिझर्व्ह बँकेनं पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला १५ मार्चपासून कोणत्याही ग्राहकाच्या खात्यात, वॉलेटमध्ये आणि फास्टॅगमध्ये ठेवी, क्रेडिट व्यवहार किंवा टॉप-अप स्वीकारण्यास बंदी घातल्यानं पेटीएम अडचणीत वाढ झाली आहे.
(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)